आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पादक त्रस्त:तापमान वाढीची केळी पिकाला झळ; घड पडले काळे अन् पानेही गळताहेत, केळीच्या वजनात घट झाल्याने उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता

नांदेड |शरद काटकर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तापमान वाढीची केळी पिकाला झळ; घड पडले काळे अन् पानेही गळताहेत, केळीच्या वजनात घट झाल्याने उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता

मागील काही दिवसांपासून उन्हाचे चटके वाढले असून याचा केळी पिकावर परिणाम होत आहे. केळीचे शेंडे करपणे, पाने खाली पडणे, घड काळे पडण्यास सुरुवात झाली आहे. केळीच्या वजनात घट झाल्याचे चित्र आहे. राज्यात केळी उत्पादनात जळगावनंतर मराठवाड्यात नांदेड जिल्ह्याचा नंबर लागतो. पण यंदा उत्पादकांना याचा फटका बसतो की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

केळी पिकाला किमान ३० ते ३५ अंशांदरम्यान तापमान आवश्यक असते. परंतु, सध्या दररोजचे तापमान हे ४० अंश सेल्सियसवर राहत आहे. त्यामुळे केळी पिकाला हे तापमान सहन करणे शक्य होत नाही. केळीला खालून पाणी दिले तरी उन्हाने वरून पाने खाली पडणे, शेंडे करपणे, घड काळे पडणे याची नेमकीच सुरुवात झाली आहे. दरम्यान, केळी पिकाला विमा कवच असल्याने थोडा आधार आहे. पण वाढत्या तापमानामुळे नुकसान जास्त होण्याची भीती कायम असल्याचे अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथील केळी उत्पादक शेतकरी शंकर मुरकुंदे यांनी “दिव्य मराठी’ला सांगितले.

अफगाणिस्तान, तुर्कस्तान, दुबईला होते केळीची निर्यात
या करा उपाययोजना

पाणी व्यवस्थापन : मे महिन्यात २५ ते ३० लिटर पाणी प्रतिझाड प्रतिदिन ठिबकद्वारे देण्यात यावे, त्यासाठी सकाळी लवकर दोन तास व संध्याकाळी दोन तास ठिबक संच चालू ठेवावा. पाणी बचत करण्यासाठी जमिनीवर दोन ओळींमध्ये आच्छादन पसरावे. त्यासाठी गव्हाचा अथवा सोयाबीनचा भुसा, उसाचे पाचट, केळीची वाळलेली निरोगी पाने यांचा वापर करावा.

उष्ण वाऱ्यापासून बागेचे संरक्षण : बागेचे उष्ण वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी लागवडीच्या वेळेस चारही बाजूंनी शेवरी, गजराज गवत यांची तीन ते चार ओळीत दाट लागवड करावी. अशी लागवड केली नसल्यास गवताची ६ ते ७ फूट उंचीची ताटी अथवा ज्वारीच्या पेंढ्या किंवा तुरीच्या तुराठ्यांची झापडी तयार करून पिकाच्या चारही बाजूंनी लावावी. त्यामुळे बागेत आर्द्रता वाढून बागेचे तापमान कमी होण्यास मदत होते. याशिवाय केळीचे घड पानांच्या साह्याने झाकावेत. वाळलेल्या पानांची पेंढी करून घडाच्या दांड्यावर बांधावी. ८० ते ९० टक्क्यांचे हिरव्या रंगाचे शेडनेटने घड झाकावेत.

असे आहे केळीचे एकरी गणित
एक एकर शेतजमिनीत ५ बाय ५ अंतरावर केळीची लागवड केल्यास १५०० झाडे बसवली जातात. १२ रुपयांना एक झाड मिळते. पुढे खत, पाणी, मजुरीसह ५० हजार रुपये एकूण लागवडीसाठी खर्च येतो. सध्या एक हजार रुपये क्विंटल दराने घडाची विक्री होत आहे. खर्च वजा जाऊन सव्वा लाख रुपये निव्वळ नफा होतो. पण, आपत्ती आल्यास खर्च निघणेही कठीण होते.

केळी चविष्ट अन् टिकाऊ
अर्धापुरी नावाची केळी देशभर प्रसिद्ध आहे. ही केळी चविष्ट आणि टिकाऊ आहे. किमान आठ दिवस केळी राहते. त्यामुळे अफगाणिस्तान, तुर्कस्तान, दुबई या देशांत येथील केळीची निर्यात होते.

बातम्या आणखी आहेत...