आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम व्यावसायिक बियाणी हत्या प्रकरण:पुढील पोलिस कोठडीसाठी आरोपींना आज न्यायालयात हजर करणार, मारेकऱ्यांची दुचाकी जप्त

नांदेड19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची ५ एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत ९ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या गुन्ह्यात मारेकऱ्यांनी वापरलेली व कुंटूर शिवारात जाळलेली पल्सर दुचाकी निष्पन्न झाली असून सदरची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ९ आरोपींची पोलिस कोठडी शुक्रवार (दि. १०) संपणार असून पुढील पोलिस कोठडीसाठी न्यायालयासमोर हजर करणार आहेत. येत्या दोन दिवसांत या प्रकरणाशी संबंधित असलेल्या दोघांना अटक करणार असल्याची माहिती एस‌आयटीचे प्रमुख तथा अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे आणि नीलेश मोरे यांनी सांगितली. नांदेड शहरातील शारदानगर येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची ५ एप्रिल रोजी सकाळी ११ च्या सुमारास त्यांच्या घरासमोर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. तब्बल ५५ दिवस तपास केल्यानंतर पोलिसांना या हत्येचा उलगडा करता आला. सहा राज्यांत तपास तसेच तीन देशांत पत्रव्यवहार करून या तपासाची कडी जोडण्यात आली. सर्वप्रथम सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर तीन आरोपींना अटक करून पोलिस कोठडीत पाठवले. एकूण नऊ आरोपींची पोलिस कोठडी १० जून रोजी संपणार आहे. पोलिस कोठडी तपासादरम्यान हल्लेखोरांनी वापरलेली काळ्या रंगाची पल्सर दुचाकी ही कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. तीच दुचाकी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. लवकरच दोन आरोपी पोलिसांच्या रडारवर असून त्यांनाही अटक करण्यात येईल असे विजय कबाडे यांनी सांगितले. खंडणी आणि दहशत याच कारणावरून संजय बियाणी यांची कुख्यात हरविंदरसिंग ऊर्फ रिंदा संधू याच्या सांगण्यावरूनच त्याच्या सहकाऱ्यांकडून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

मोठ्या एजन्सीजकडून तपास
संजय बियाणी हत्या प्रकरणात आरोपीने वापरलेली दुचाकी अखेर पोलिसांना सापडली. यापूर्वी एकूण ९ जण ताब्यात असून त्यांची शुक्रवारी पोलिस कोठडी संपत आहे. या गुन्ह्यातील तपासादरम्यान इतर राज्यांतील पोलिसदेखील नांदेडला येऊन गेली आहे आणि रिंदाच्या तपासात फार मोठ्या एजन्सी काम करत आहेत. या प्रकरणात अजून काही धागेदोरे हाती येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

हार्डडिस्क चोरीप्रकरणी प्रवीण बियाणी पोलिसांच्या ताब्यात
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर बियाणी कुटुंबात आर्थिक वाद सुरू झाला आहे. बियाणी यांच्या पत्नी अनिता बियाणी यांनी आपले दीर प्रवीण बियाणीविरुद्ध हिशेबाची हार्डडिस्क चोरी केल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, संजय बियाणी यांच्या पत्नी अनिता संजय बियाणी यांनी आपले दीर प्रवीण बालाजीप्रसाद बियाणी यांनी राज मॉल येथील फायनान्स ऑफिसमधून १ टीबी क्षमतेची संपूर्ण आर्थिक व्यवहाराची हार्डडिस्क चोरून नेल्याची तक्रार विमानतळ पोलिस ठाण्यात दिली होती. प्रवीण बियाणी तेव्हाच छातीत त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल झाले होते. उपचारानंतर विमानतळ पोलिसांनी गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रवीण बियाणी यांना ताब्यात घेतले. चाैकशी केल्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...