आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर गोळी झाडणाऱ्या मुख्य मारेकऱ्याचे नाव तपासात समाेर आले आहे. त्याचबरोबर रेकी करून घर दाखवणाऱ्याला पोलिसांनी अटक झाली. उज्जैन येथील दोघेजण आणि नांदेडचा एक अशा तिघांना बुधवारी (१५ जून) जिल्हा न्यायाधीश श.ए.बांगर यांच्या न्यायालयात हजर केले असता २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. संजय बियाणी यांची त्यांच्या शारदानगर येथील घरासमोर ५ एप्रिल रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी सर्वप्रथम ६, त्यानंतर ३, नंतर दोन आणि एक असे बारा आरोपी एकापाठोपाठ अटक केले. या सर्वांवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्याही सर्व पथकांनी या प्रकरणात समांतर तपास करून आरोपींना अटक केली आहे. उज्जैन (मध्य प्रदेश) येथील दिल्लीच्या तिहार जेलमधून राजपालसिंग ईश्वरसिंग चंद्रावत आणि योगेश कैलासचंद्र भाटी या दोघांची बुधवारी पोलिस कोठडी संपली होती. त्यापूर्वी अटकेतील आरोपी गोलू मंगनाळे, त्याचा मित्र रणजित सुभाष मांजरमकर (२८, रा. नांदेड) याने मुख्य मारेकरी सुनील यास रेकी करून संजय बियाणी यांचे घर दाखवले होते, असे तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, बियाणी हत्या प्रकरणात मुख्य आराेपी खूप दिवसांपासून पोलिसांच्या हाती लागत नाही. परंतु आता त्याला पकडण्यासाठी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असल्याने लवकरच त्याच्या मुसक्या आवळणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
मुख्य मारेकऱ्यास पकडणार
दोन्ही आरोपींसह रणजित सुभाष मांजरमकर याला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले. २० जूनपर्यंत पाेलिस काेठडी वाढवण्यात आली. या प्रकरणात मुख्य मारेकरी लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकेल, असा विश्वास तपासिक अंमलदार सहायक पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, पोलिस निरीक्षक संतोष तांबे आणि सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी व्यक्त केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.