आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला बुधवारी (९ नोव्हेंबर) शंकरनगर रामतीर्थ येथून सुरुवात झाली. या वेळी ठिकाठिकाणी मार्गावर टाळ-मृदंगाचा गजर अन् ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’च्या जयघोषात यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. कुठे मुलींचे लेझीम पथक, कुठे पारंपरिक पोशाख, तर कुठे देशाच्या विविधतेतून एकतेचे दर्शन भारत जोडो यात्रेतून घडवण्यात आले.
तिसऱ्या दिवशी भारत जोडो यात्रा बुधवारी शंकरनगर रामतीर्थ येथून पहाटे ५.४५ वाजता सुरू झाली. किन्हाळा, हिप्परगा माळ, नरसी, नायगाव बाजारपर्यंत सकाळच्या सत्रात प्रवास करण्यात आला. या वेळी अभूतपूर्व असा प्रतिसाद दिसून आला. “जातपात का बंधन तोडो, भारत जोडो’, “वंदे मातरम्...’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला. नरसी येथे लिटल स्टेप ज्ञानवर्धिनी शाळेच्या मुली एनसीसी गणवेशात स्वागतासाठी उभ्या होत्या. वारकरी भजन गात होते. कोणी झेंडे उंचवत, कोणी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा उंचावत घोषणा देत होते.
‘मन की बात’ची यात्रा नाही, जनतेची चिंता : जयराम रमेश भारत जोडो यात्रा ही राजकीय फायद्या-तोट्यासाठीही नाही. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत. पहिल्या दिवसापासून विरोधक टीका करत आहेत. त्याला काँग्रेस महत्त्व देत नाही. ही यात्रा ‘मन की बात’ची यात्रा नसून ‘जनतेच्या चिंते’ची यात्रा आहे, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे ते पत्रकारांशी संवाद साधत होते. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप आदी उपस्थित होते.
खा. सुप्रिया सुळे, आ. जयंत पाटील यात्रेत होणार सहभागी १० नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खा. सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.
‘देशाला समजून घ्यायचे असेल तर रस्त्याने चालावे’ भारत जोडो यात्रेतून व्यापारी, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना समजून घेत आहे. देशाला समजायचे असेल तर रस्त्याने चालावे लागते. रस्ता ही समजतो आणि रस्त्याने राज्याचा दर्जा समजतो, असे खासदार राहुल गांधी म्हणाले. भारत जोडो यात्रेदरम्यान, कृष्णूर येथील कॉर्नर मिटींगमध्ये ते बोलत होते. पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, नोटबंदीने आर्थिक त्सुनामी आली. नोटबंदी निर्णय नाही स्टंटबाजी होती. छोट्या व्यापाऱ्यांना संपवण्याचे षडयंत्र आहे. गुजरात निवडणुकीमुळे रोजगार हिसकावून घेतला जात आहे. भाजप, विश्व हिंदू परिषद जातीवाद पसरवत आहे. देशात प्रात्यक्षिक शिक्षण मिळत नाही. यामुळे कारखानदार रोजगार देत नाहीत. युवक बेरोजगार होतील. लोकांची ताकद व प्रेम यामुळे काश्मिरपर्यंतचा प्रवास पूर्ण करणार असून कुणीही घाबरू नका, असेही राहुल गांधी म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.