आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल्डर संजय बियाणी हत्याकांड प्रकरण:तीस अधिकारी, 60 कर्मचारी आणि 6 राज्यांत तपास करून हत्येचा छडा, गोळ्या झाडणारा फरारच

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या नांदेडचे प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी हत्याकांडाचा पोलिसांनी ५५ दिवसांनंतर छडा लावला आहे. या प्रकरणात ६ आरोपींना अटक झाली असून ते सर्व कुख्यात गुंड हरविंदरसिंग ऊर्फ रिंदाच्या गँगचे असल्याचे समोर येत आहे. गोळ्या झाडणारा आरोपी फरार असला तरी त्याला लवकरच अटक होईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हत्याकांडातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांवर प्रचंड दबाव होता. ३० अधिकारी, ६० कर्मचाऱ्यांनी सहा राज्यांत तपास करून ५५ दिवसांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

५ एप्रिल २०२२ रोजी नांदेड येथील शारदानगर परिसरातील घरासमोर संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. या प्रकारानंतर नांदेडसह राज्यात ठिकठिकाणी व्यापारी व अन्य संघटनांकडून मोर्चा काढून निषेध करण्यात आला होता. पोलिस यंत्रणेच्या विरोधात घोषणाबाजी, कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या वेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी घटनेचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी केली होती. खंडणीसाठी ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना होता. या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला सुरुवात केली होती. या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली. भोकरचे अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे हे एसआयटीचे प्रमुख होते. त्यांच्या मदतीला नांदेडचे अपर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यासह ३० अधिकारी, ६० कर्मचाऱ्यांनी या हत्येचा तपास करून आरोपींना पकडले.

रेकॉर्डवरील गुन्हेगारांची घेतली झाडाझडती, शस्त्रेही केली जप्त नांदेड पोलिसांनी सर्वप्रथम रेकॉर्डवरील ४५ गुन्हेगारांची चौकशी केली. त्यानंतर अपर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे यांनी आपल्या विशेष सहकाऱ्यांसह ५ एप्रिल ते ३ मेदरम्यान शहर व जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यात रेकॉर्डवरील ९६ आरोपींपैकी ७३ जणांची तपासणी केली. त्यापैकी ६३ आरोपींची घरझडती घेण्यात आली. ५५ जण घरी सापडले, तर सात आरोपींवर चेकिंगदरम्यान कारवाई करण्यात आली. यात आरोपींकडून ४३ तलवारी, २८ खंजीर, चाकू, १० नकली व ५ खऱ्या पिस्तूल जप्त करण्यात आले. या वेळी ५० जणांवर गुन्हे दाखल झाले. ८ एप्रिल रोजी कौठा परिसरात गेलेल्या ग्रामीण पोलिसांच्या पथकाच्या वाहनावर एका आरोपीने तलवारीने हल्ला करत वाहनाच्या काचा फोडल्या होत्या. यात पोलिस अंमलदार शिवाजी पाटील जखमी झाले. या वेळी हल्ला होण्यापूर्वीच पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी पिस्तुलाने आरोपीवर गोळ्या झाडून त्याला जखमी केले होते.

तपास भरकटवण्याचाही प्रयत्न बियाणी हत्याकांडाचा तपास सुरू असताना तो भरकटवण्याचाही प्रयत्न झाला. तपासाच्या दृष्टीने वेगवेगळ्या टीम काम करत असताना या प्रकरणात वापरण्यात आलेली दुचाकी कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जाळण्यात आली. ११ एप्रिल रोजी एक निनावी पत्र बियाणी यांच्या घरी आले होते. यात बियाणी यांच्या हत्येचा कट परभणीत रचल्याचे म्हटले होते.

खंडणीची मागणी होताच संपर्क साधा
या घटनेचा फायदा घेऊन खंडणी वसुलीसाठी काही गुन्हेगारांनी प्रयत्न केले. त्यांच्याविरुद्ध स्वतंत्रपणे पोलिस ठाणे भाग्यनगर व विमानतळ येथे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. यानंतरही कुणाला खंडणीसाठी मागणी होत असल्यास त्यांनी नांदेड येथील पोलिस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...