आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या नांदेड तहसीलच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला केला होता. हल्लेखोर पाच जणांना जिल्हा न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी शुक्रवार (२ डिसेंबर) तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी १९ हजार रुपये रोख दंडाची शिक्षा सुनावली. नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोदावरी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती नांदेड तहसीलदारांना मिळाली. त्यांनी संबंधित घाटावर कारवाई करण्यासाठी विष्णुपुरीचे मंडळ अधिकारी कोंडीबा माधव नागमवाड व त्यांचे सहकारी तलाठी अनिल धुळगंडे, मनोज देवणे, सचिन नरवाडे, बालाजी सोनटक्के, प्रदीप पाटील, कैलास सूर्यवंशी आणि जहीर खान हे शासकीय वाहनातून (एमएच २६ आर २६११) विष्णुपुरी परिसरात गेले होते. या वेळी पथक येत असल्याची चाहूल वाळूमाफियांना मिळाली. ही घटना २० जानेवारी २००० रोजीची आहे. वाळूमाफिया जुना कौठा येथील शुभम बालाजी जाधव, धरम हनुमंत जाधव, रवी लक्ष्मण माने, बाबू अरुण जाधव आणि आकाश भगवान माने यांनी दगडांनी व विटांनी हल्ला चढवला. यात शासकीय वाहनाची तोडफोड करण्यात आली. अखेर पथक माघारी फिरले. कोंडीबा नागमवाड यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात वरील पाचही वाळूमाफियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेख जावेद यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाने सहा साक्षीदार तपासले. जिल्हा सरकारी वकील रणजित देशमुख यांचा युक्तिवाद आणि सर्व उपलब्ध पुराव्याआधारे जिल्हा न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी या पाचही आरोपींना तीन वर्षेे सक्तमजुरी आणि प्रत्येकी १९ हजार ७५० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.