आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:हळदीला क्विंटलमागे सरासरी 65000 रुपये दर, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यापासून दरात चढ-उतार

नांदेड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप हंगामाची एकीकडे लगबग सुरू असताना नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यापासून हळदीच्या दरात चढ-उतार असल्याचे चित्र आहे. कमाल आणि सरासरीच्या दरात क्विंटलमागे ३५० ते ४०० रुपयांची तफावत दिसून येत आहे. मागणी पेक्षा पुरवठा जास्त झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. सध्या क्विंटलला ६५०० सरासरी दर मिळत आहे. मराठवाड्यात नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने हळदीचे पीक घेतले जाते. साधारणपणे लागवड ते काढीपर्यंत सरासरी एकरी ५० ते ६० हजारांपर्यंत खर्च येतो. हळदीचे चांगले उत्पन्न झाले तर ते एकरी २५ ते ३० क्विंटलपर्यंत मिळते. प्रत्येकी क्विंटलला तीन हजार रुपये लागवड ते काढणीपर्यंतचा खर्च येतो. हळदीला किमान ७ ते ८ हजार रुपये भाव मिळाला तरच हे पीक शेतकऱ्यांना परवडते. गतवर्षी मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली होती.

विशेष म्हणजे, गतवर्षी कोरडवाहू क्षेत्रात सर्वाधिक उत्पादन घेण्यात आले. त्यामुळे उतारा जास्त आला. फेब्रुवारीपर्यंत पिकाला पाणी मिळाल्याने त्याचा फायदा झाला आहे. एकरी ३० क्विंटलचे सरासरी उत्पादन मिळत आहे. तर, बागायत क्षेत्रात १० ते १५ क्विंटलचे उत्पादन आले आहे. जास्त पाण्याचा फटका बसला आहे. अतिवृष्टीने किडीचा प्रादुर्भाव जास्त झाला आहे. त्यामुळे यंदा बागयती क्षेत्रात लागवड क्षेत्र घटणार असून कोरडवाहूमध्ये वाढेल, असे असे शेतकऱ्यांतून सांगितले जाते.

उतारा घटल्याने हळदीचे दर टिकून राहतील, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात परिस्थितीच्या उलट चित्र निर्माण झाले आहे. मागणी पुरवठा जास्त झाल्याने दरही घसरले आहेत. तसेच हळदीचे दर वाढतील म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी वेअर हाऊसमध्ये साठवणूक केली आहे. परंतु, दर वाढतील अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. दरम्यान, केळीला दर चांगला असल्याने केळीचे क्षेत्र वाढणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

अद्याप अपेक्षित दर मिळाला नाही अर्धापूर तालुक्यात ७० एकर शेतजमीन असून पारंपरिकसोबतच नवीन पिके घेतली जातात. दरवर्षी हळदीचे पीक घेतो. दर वाढतील म्हणून गतवर्षीची ७०० क्विंटल हळद वेअर हाऊसमध्ये साठवून ठेवली आहे. परंतु, अद्याप अपेक्षित दर मिळाला नाही. आता किडे लागण्याची भीती असल्याने आहे त्या दरात हळद विकण्याची वेळी आली आहे. आर. आर. देशमुख, हळद उत्पादक शेतकरी, अर्धापूर.

पाच दिवसांतील हळदीचे दर (क्विंटलमध्ये) दिनांक कमाल किमान सरासरी १३ ८५९५ ६००० ६९०० १४ ७८०० ५८०० ६८०० १५ ७७७५ ५८०० ६६०० १६ ७८०० ५८०० ६६०० १७ ७६०० ५८०० ६५००

बातम्या आणखी आहेत...