आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या संकटात पालक गमावलेल्या चांदवड तालुक्यातील भोयगाव येथून तालुक्यातील बाळापूर येथील मामांकडे रहावयास आलेल्या दोन अनाथ बालकांना येथील तहसीलदार प्रमोद हिले यांनी गत महिन्यात दत्तक घेतले हाेते. त्यानंतर मंगळवारी (दि. २९) शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत दोन्ही अनाथ मुलांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या ठेवीचे वाटप पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.
कोविड संक्रमणाच्या दुसऱ्या टप्यात जयश्री गलांडे यांचे २३ एप्रिल २१ रोजी तर वसंत गलांडे यांचे २४ मे २१ रोजी निधन झाले होते. आईवडिलांचे छत्र महिनाभरातच कोरोनामुळे हरवल्याने अनिकेत (१४) व प्रशांत (१२) ही मुले अनाथ झाली होती. त्यानंतर ते बाळापूर येथील मामा खंडेराव आवारे यांच्याकडे राहावयास आली आहेत. या बालकांची भावनिक व वैयक्तिक हानी भरून निघणे अशक्य आहे. तथापि, या बालकांचे शिक्षण व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होईपर्यंतचे आयुष्य त्यांना सन्मानाने जगता यावे व याकामी आर्थिकदृष्ट्या पूरक ठरावी या हेतूने राज्य शासनाकडून मदत केली जात आहे.
शासनाच्या या योगदानामुळे यार बालकांचा आर्थिक व सामाजिक विकास होण्यास मदत होणार आहे. माणुसकी फाउंडेशनच्या वतीने ११ हजार रुपये रोख मदतही देण्यात आली. पुढील काळात या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही पार पाडण्याचा मनोदय असून या कामी येवलेकर नागरिकांचा मोठा हातभार आहे. यावेळी कोविडकाळात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मयत झालेल्या नऊ महिलांना प्रत्येकी रुपये वीस हजारांचे धनादेश व सहा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे प्रत्येकी ११०० रुपये प्रति महिना लाभ यांचेही वाटप भुजबळ यांच्या हस्ते वाटप करून मायेचा आधार देण्यात आला. याप्रसंगी प्रांताधिकारी ज्योती कावरे, तहसीलदार प्रमोद हिले, बालविकास प्रकल्प अधिकारी कोकणी, अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, अल्केश कासलीवाल, बाळासाहेब लोखंडे, वसंतराव पवार, अरुण शिरसाठ आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.