आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकांचे नुकसान:वडांगळी व चोंढी परिसरात दोन तासांत १२० मिमी पाऊस; २०० एकरवरील पिके पाण्यात

सिन्नर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडांगळी, चोंढी शिवारात सलग दोन दिवस ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे २०० एकरहून अधिक पिके पाण्याखाली गेली आहेत. कोथिंबीर, टाेमॅटाे, मेथी इत्यादी भाजीपाल्यांसह मका, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. तर पावसामुळे शेतजमिनीचे भरून न येणारे नुकसान झाले आहे.

चोंढी येथील सरपंच योगेश पानगव्हाणे, भाऊसाहेब मवाळ, अशोक मवाळ, सुरेश निंबायतकर, महेश पानगव्हाणे, प्रकाश पानगव्हाणे आदींसह शेतकऱ्यांनी पिके व शेतीचे नुकसान झाल्याची माहिती दिली. परिसरात गत दहा वर्षांत असा जोरदार पाऊस झाला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शुक्रवारी दुपारी चार वाजता पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत दमदार पाऊस कोसळला. परिसरातील नाले भरभरून वाहू लागले. चोंढी येथील गावतळे एकाच पावसात भरून ओसंडून वाहू लागले. मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने शेताचे बांध फुटले. शेतजमीन वाहून जाण्याच्या घटना घडल्या. त्याचबरोबर पिकेही वाहून गेली. शेतात तसेच पाणी साचून आहे. असे असतानाच शनिवारी पुन्हा दुपारी दमदार पाऊस कोसळला. या पावसानेही नुकसानीत आणखीच भर पडली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने पंचनामे करावे, अशी मागणी वंडागळी व चाेंढी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

ढगफुटीसदृश दुसरी घटना
गत महिन्यात डुबेरे, सोनारी, सोनांबे, कोनांबे, पांढुर्ली परिसरात एकाच तासात ८८ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. तर शुक्रवारी (दि. ५) चोंढी, वडांगळी शिवारात दोन तासात १२० मिमी पाऊस पडला आहे. यंदाच्या पावसाळ्यात जोरदार पाऊस पडण्याची ही दुसरी
घटना आहे.

पंचनामे तातडीने कराव
जोरदार पावसामुळे शेतजमीन व उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तथापि स्थितीची पाहणी करण्यासाठी कोणीही फिरकलेले नाही. नुकसानीची पाहणी करून तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी सोमठाणेचे सरपंच भारत कोकाटे व चोंढीचे सरपंच योगेश पानगव्हाणे यांनी केली आहे.