आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:13 अवैध धंद्यांवर छापे, 39 संशयितांना अटक

मालेगाव2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर विभागाचे सहायक पाेलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर धडक कारवाया सुरू केल्या आहेत. वाढती गुन्हेगारी व अवैध धंदे माेडीत काढत महिन्यात स्वत: १३ ठिकाणी छापेमारी केली आहे. या कारवाईमध्ये ३९ संशयितांच्या मुसक्या आवळून तब्बल ११ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. राजकीय दबाव झुगारून अवैध धंद्याचे कंबरडे माेडणाऱ्या संधूंच्या कारवायांमुळे शहरात खाकीचा दरारा निर्माण झाला आहे.

शहराच्या अनेक भागांमध्ये छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरू आहेत. गुन्हेगारी वाढीचे मूळ ठरणारे अवैध धंदे तत्काळ बंद करण्याच्या सूचना संधू यांनी सर्वच पाेलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गोपनीय माहिती काढून त्यांनी स्वत: पथकासह छाप्यांचे सत्र सुरू केले आहे. महिनाभराच्या काळात गाेवंश, गुटखा विक्री, जुगार, अमली पदार्थांची विक्री, गॅस सिलिंडरचा काळाबाजार अशा अवैध धंद्यांवर कारवाया केल्या.

शहर, आयेशानगर, पवारवाडी, रमजानपुरा, आझादनगर, किल्ला, छावणी या पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत १३ ठिकाणी छापे टाकून ४३ संशयितांविरोधात गुन्हे दाखल करत ३९ जणांना अटक केली आहे. कारवायांदरम्यान फरार झालेल्या तिघांचा शाेध सुरू आहे. कारवायांमध्ये ११ लाखांचा मुद्देमाल जप्त झाला आहे. संधूंच्या यांच्या कारवायांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अनेक भागातील बेकायदा धंदे बंद झाले असून मटकाकिंग व सट्टामालकांनी तर अक्षरश: गाशा गुंडाळला आहे. भविष्यातही अवैध धंद्यांवर कारवाया सुरु राहतील, असे संधू यांनी सांगितले. संधू यांच्या विशेष पथकात पाेलिस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पाेलिस नाईक इम्रान सय्यद व कर्मचारी दिनेश शेरावते काम करत आहे.

ठाणेदारांना सक्त ताकीद
सर्वच प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना ठाणेदारांना दिल्या आहेत. कुठल्याही प्रकारचे बेकायदा धंदे खपवून घेतले जाणार नाही. शहर गुन्हेगारी व अवैध धंदेमुक्त करण्यासाठी छापेमारी सुरूच राहील.- तेगबीरसिंह संधू, सहायक पाेलिस अधीक्षक, मालेगाव

बातम्या आणखी आहेत...