आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस:5 तासांत 165 मिमी पाऊस, बंधारा फुटला

घोटीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात बुधवारी रात्री जाेरदार पाऊस झाला. फळविहीरवाडी येथील बंधारा फुटल्याने किमान ५० ते ६० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाले आहे. काही घरांचेही नुकसान झाले आहे. फळविहीरवाडी गावाला जाणारा रस्ता वाहून गेला आहे. दरम्यान, पाच तासांत इगतपुरी तालुक्यात १६५ मिमी पाऊस झाला आहे.

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात मध्यरात्रीपर्यंत वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात तब्बल अडीच तास मुसळधार पाऊस झाला. अस्वली स्टेशन परिसरात गारा पडल्या. यामुळे बागायती पिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लष्करी हद्दीतील डोंगरमाथ्यावरील नाल्याला आलेल्या पुराचे पाणी अस्वलीच्या घरांमध्ये शिरल्याने अन्नधान्याची नुकसान झाले.

बागलाणमध्ये ३५ मिमी पाऊस, वीज पडून बैल ठार सटाणा | शहरासह परिसरात बुधवारी रात्री तीन तास मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. विजांचा लखलखाट आणि ढगांच्या कडकडाटामुळे वीजपुरवठाही खंडित झाला होता. तालुक्यातील विंचुरे येथे वीज पडून बैल ठार झाला. बागलाण तालुक्यात सरासरी ३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ढगांच्या कडकडाटात व विजेच्या लखलखाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी पहाटेपर्यंत पाऊस सुरू होता.

सिन्नर तालुक्यात दुसऱ्या दिवशीही पाऊस, देवनदीला पूर सिन्नर | तालुक्यात बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. देवनदीला पूर आला होता. त्यामुळे गुरुवारी दुपारपर्यंत दातली येथे देवनदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. याशिवाय वडांगळी, खडांगळी येथील पुलांवरूनही पाणी वाहिल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.

दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस कोसळला. पाऊस इतका जोरात होता की काही क्षणांतच सगळीकडे पाणीच पाणी झाले. रात्री उशिरापर्यंत कमी-जास्त प्रमाणात दोन तासाहून अधिक वेळ पाऊस सुरूच होता.

पावसाने ओढ दिल्याने माना टाकलेल्या पूर्व भागातील पिकांना बुधवारी रात्री झालेल्या पावसाने संजीवनी मिळाली आहे. तर पश्चिम पट्ट्यातील पांढुर्ली, शिवडा बोरखिंड, आगासखिंड, ठाणगाव या भागात शेतांमध्ये मात्र पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. दातली येथे पुलावरून पाहणी वाहत असल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला. म्हाळुंगी आणि देवनदी दुथडी भरून वाहत हाेते.

शिवडे, ठाणगाव परिसरात शेतीचे नुकसान
पांढुर्ली मंडळात १२५ मिमी पाऊस झाला. शिवडे येथे गट नंबर ८२८ मधील हरी शेळके यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेतातील बंधारा फुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ३० ते ३५ शेतकऱ्यांची ४० एकर शेती बाधित झाली. सहा ते सात घरांमध्ये पाणी घुसून नुकसान झाले.

बातम्या आणखी आहेत...