आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरिपात समाधानकारक पाऊस झाल्याने नद्या, नाले, ओढे, ओहोळ अजूनही प्रवाही आहेत. त्यामुळे वाहून जाणाऱ्या पाण्याचा उपयोग होण्यासाठी तालुक्यात लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. कृषी विभागाने ४४ गावात १८७ बंधाऱ्यांची निर्मिती केली असून त्याद्वारे दोन दशलक्ष घनफूट पाणी अडवण्यात यश आले आहे.
वनराई बंधारे बांधलेल्या परिसरात जमिनीचा ओलावा टिकून राहण्यास मदत होते. दुष्काळी भाग म्हणून ओळख पुसण्यास काहीशी मदत मिळते. रब्बी पिकांना व पशु-पक्ष्यांसाठी पाणीसाठे उपलब्ध व्हावेत, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडावी यामुळे हा उपक्रम फायदेशीर आहे. वनराई बंधाऱ्यांमुळे परिसरातील जलपातळी सुधारण्यास मदत होणार आहे.
दोन हजार नागरिकांचा लोकसहभाग तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन मंडल अधिकारी, सहा पर्यवेक्षक, ३० कृषी सहायकांच्या मदतीने वनराई बंधारे निर्मिती उपक्रम राबवण्यात आला. आत्मातील शेतकरी गटांचे सदस्य, कृषिमित्र, महिला गट, विद्यार्थी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. एकूण दोन हजार नागरिकांच्या सहभागातून १८७ वनराई बंधारे उभे राहिले.
बंधारे बांधकामासाठी खर्च शून्य वनराई बंधाऱ्यांची निर्मिती पूर्णपणे लोकसहभागातून झाली आहे. बंधारे बांधण्यासाठी सिमेंटच्या रिकाम्या गोण्या जमा करण्यात आल्या. बांधकाम व्यावसायिकांकडून त्या मोफत मिळाल्या. त्यात वाळू भरून बंधारे तयार करण्यात आले. रचलेल्या गोण्यांच्या फटीत माती भरण्यात आली. त्यामुळे बंधारे बांधण्यासाठी शून्य खर्च आला आहे.
५२३ शेतकऱ्यांना लाभ वनराई बंधाऱ्यांची निर्मिती झालेल्या परिसरात साचलेल्या पाण्यामुळे २३६ हेक्टरवरील रब्बी पिकांना फायदा होणार आहे. त्याचा प्रत्यक्ष ५२३ शेतकऱ्यांना लाभ होईल. सुमारे १२५ विहिरींची जलपातळी सुधारू शकेल. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वीच तळ गाठणाऱ्या विहिरी जूनपर्यंत तग धरू शकतील.
कमी श्रमात चांगले बंधारे सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये वाळू भरून पाणी वाहणाऱ्या नाल्याच्या योग्य ठिकाणी प्रवाहाला आडव्या रांगेत गोण्या टाकल्या जातात. कमी श्रमात चांगला बंधारा तयार होतो. बंधारा तात्पुरता असला तरी रब्बी हंगामासाठी लाभ होईल. - अण्णासाहेब गागरे, तालुका कृषी अधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.