आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकडवा धरणातून सोडण्यात येणाऱ्या रब्बी आवर्तनातून शिल्लक राहिलेल्या २५० दलघफू आवर्तन कालव्याला नुकतेच सोडण्यात आले आहे. शेतीसाठी प्रत्यक्षात हे पाणी दिले जाणार नाही. मात्र केवळ कालवा रिचार्ज होऊन कालव्याकडेच्या ७०० हून अधिक विहिरींची पाणी पातळी उंचावण्यास या आवर्तनामुळे लाभ होणार आहे. कडवा धरणातून रब्बीसाठी जानेवारी महिन्यात १०२० दलघफू आवर्तन सोडण्याचे नियोजित होते. कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या सिन्नर व निफाड या दोन्ही तालुक्यात पर्जन्यमान मुबलक असल्याने यंदा पाणी मागणी कमी प्रमाणात नोंदवली गेली. परिणामी कालव्याचे आवर्तन मुदतीपूर्वीच बंद करण्यात आले. १०२० पैकी ७७० दशलक्ष घनफूट पाणी आवर्तनासाठी वापरले गेले.
त्यातून ३५०० हेक्टर क्षेत्र भिजले. तर उर्वरित २५० दलघफू पाणी धरणात शिल्लक राहिले. मात्र सध्या पाण्याची काही प्रमाणात निकड भासू लागल्याने शेतकऱ्यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे कडवाचे उर्वरित पाण्याचे आवर्तन मे महिन्यात सोडण्याऐवजी लगेच सोडल्यास पाण्याचे परकोलेशन होऊन विहिरींना लाभ होईल, अशी मागणी केली होती. त्यावर आमदार कोकाटे यांनी कडवाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बागुल यांच्याशी चर्चा करून रब्बीतून उरलेल्या २५० दलघफू आवर्तन सोडावे अशा सूचना दिल्या.
पाणी वाया जाण्याऐवजी शेतीला ठरणार उपयोगी
मार्च, एप्रिल, मे हे तीन महिने कडक उन्हाळ्याचे असल्याने मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होईल. रब्बी आवर्तनातून धरणात शिल्लक राहिलेले शेतकऱ्यांच्या हक्काचे २५० दलघफू पाणी वाया जाईल. त्यापेक्षा ते कालव्याला सोडल्यास कालवा रिचार्ज होण्याबरोबरच कालव्याकडेच्या विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होईल, ही बाब आमदार कोकाटे यांनी कडवाच्या अधिकाऱ्यांना पटवून दिल्यानंतर त्यांनीही आवर्तन सोडण्यास होकार दिला.
450 दलघफू पाणी योजनासाठीही आरक्षित
शनिवारी कडवा कालव्याला आवर्तन सोडण्यात आले आहे. पाचव्या दिवशी पाणी बुधवारी (दि.१) वडांगळीच्या पुढे झेपावले होते. शेवटच्या ८८ किलोमीटरला पुतळेवाडी पर्यंत एक-दोन दिवसात पाणी पोहोचण्याची अपेक्षा आहे. २५० दशलक्ष घनफूट पाणी संपताच हे आवर्तन बंद करण्यात येणार आहे. ४५० दलघफू पाणी इगतपुरी तालुक्यातील पाणीपुरवठा योजना आणि सिन्नर नगरपालिकेच्या पाणी योजनेसाठी आरक्षित ठेवण्यात येणार असल्याचे कडवाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय धरणापासून किमान ४-५ किलोमीटर कडवा नदीकाठच्या पाणीपुरवठा योजनांना बळकटी देण्यासाठी उन्हाळ्यात आवर्तन सोडले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.