आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिन्नर तालुक्याच्या पूर्व भागासाठी संजीवनी ठरणाऱ्या कुंदेवाडी - सायाळे या बंदिस्त पूर कालव्याद्वारे देव नदीतून पाणी वळवण्यात आले आहे. त्यातून कुंदेवाडी, मुसळगाव, हाबेवाडी, गुरेवाडी आणि गोंदे परिसरातील आठ बंधारे भरून घेण्यात आले आहे. जवळपास ३० दशलक्ष घनफूट पाणी वळवण्यात जलसंधारण विभागास यश आले आहे. हे पाणी गोंदेनाल्यातून दातली पाझर तलावात सोडण्यात आले आहे. ५० दशलक्ष घनफूट क्षमता असलेला दातलीचा पाझर तलाव भरल्यास परिसरातील गावांना किमान दोन वर्षे पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही.
कुंदेवाडी - सायाळे आणि खोपडी मिरगाव हे दोन्ही बंदिस्त पूर कालवे पूर्व भागात नेऊन तेथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी हे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ हाती घेतले आहेत. दोन्ही प्रकल्पांचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. कुंदेवाडी - सायाळे या ३४ किलाेमिटर लांबीच्या पूर कालव्याचे काम खंबाळे शिवारात १८ किलाेमिटरपर्यंत झाले आहे. १४ जुलै रोजी देवनदीला पाणी येताच चाचणी घेण्यात आली होती. मात्र, साडेचार किलोमीटरवर १०० मीटर काम बाकी होते. ते पूर्ण करून पाणी आता थेट ८.५ किलोमीटरपर्यंत गोंदे नाल्यात पोहोचले आहे.
कुंदेवाडी - सायाळे पूर कालव्याचे पाणी ४ ऑगस्ट रोजी वळविण्यात आले. साखळी क्रमांक ८६० वरील कुंदेवाडी शिवारातील भाट ओहोळा मधील २ बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर साखळी क्रमांक ३२५० मधील गुरेवाडी शिवारातील दोन बंधारे भरण्यात आले. त्यानंतर मुसळगाव शिवारातील ४ बंधारे शनिवारी (दि.६) पूर्ण भरले. हे पाणी नंतर गोंदे नाल्यात सोडून तेथील सिमेंट बंधारे ओव्हर फ्लो झाल्यानंतर पाण्याने दातली पाझर तलावाकडे कूच केली. या परिसरात पावसाचे प्रमाण नगण्य असून परिसरातील बांधबंधारे कोरडे ठाक आहेत. त्यामुळे पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या या भागाला बंदिस्त पूरचारीचे पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासोबतच पाझर तलावातील पाण्याचा शेती सिंचनासाठी ही लाभ होणार आहे.
..तर पाणी महिनाभरात खंबाळे शिवारात
८.५ किलोमीटरला गोंदे शिवारात पूर कालव्याचे २०० मीटरचे काम बाकी आहे. तेथे पाइपलाइनसाठी काँक्रिटीकरण करावे लागणार असल्याने त्यासाठी महिनाभराचा कालावधी लागणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर देव नदीचे पाणी यंदा खंबाळे शिवारात पोहोचण्याची अपेक्षा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.