आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासन स्तरावर बँक पातळीवर येणाऱ्या अडचणी दूर करण्यात दिरंगाई होत असल्याने जिल्ह्यातील २१ हजार ७०८ मजुरांची ३ कोटी ४५ लाख ७९ हजार ६०२ रुपये इतकी मजुरीची रक्कम पावणे २ महिन्यांपासून रखडली आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या मजुरांचे हाल सुरू आहे. लाल फितीचा फटका रोजंदारीवर काम करणाऱ्या नरेगाच्या मजुरांना बसला आहे.
रोहयोमधील अधिकारी, कर्मचारी आणि रोजगार सेवकांचा संप यामुळे जिल्ह्यातील रोहयोच्या कामांची संख्या मंदावली आहे. त्यातच १२ डिसेंबर २०२२ पासून रोजगार हमीवर काम करणाऱ्या मजुरांना त्यांच्या मजुरी पोटी देण्यात येणारे वेतनच बँक खात्यात वर्ग न झाल्याने त्यांची आबाळ सुरू आहे. खासगी ठिकाणी मजुरी करणाऱ्या मजुरांना ३०० ते ४०० रुपये मोबदला दिला जातो.
रोजगार हमीतून मिळणारी २५६ रुपये मजुरी अल्प असल्याने या कामांवर मजूरही मिळत नाही. त्यांना ८ दिवसांत मजुरीची रक्कम वर्ग करणे अपेक्षित असताना बँक स्तरावर असलेल्या अडचणीमुळे नरेगासाठी अनुदान असूनही पावणे दोन महिने उलटूनही घामाचे दाम मिळत नसल्याने मजुरांत नाराजी आहे. कळवण तालुक्यात सर्वाधिक २६९८ मजुरांचे ४२ लाख ६४ हजार २१४ रुपयांचे तर सर्वात कमी देवळा तालुक्यात २४१ मजुरांचे ३ लाख ८१ हजार ९३६ रुपयांचे वेतन थकीत आहे.
संपूर्ण राज्यभरातच समस्या
बँक पातळीवर सुरू असलेल्या अडचणींमुळे संपूर्ण राज्यभरातच मजुरांना वेतन मिळालेले नाही. यासंदर्भात नागपूर नरेगा आयुक्त कार्यालयास पत्रव्यवहार करण्यात आला आहे. १५ दिवसांपूर्वी पुन्हा स्मरणपत्र पाठवण्यात आले आहे. -सनी धात्रक, जिल्हा माहिती व्यवस्था समन्वयक, नरेगा
काम करूनही मजुरी मिळेना
गावात रोहयोतून सुरू असलेल्या रस्त्यावर जानेवारी महिन्यात १५ दिवस काम केले, मात्र त्याची अद्यापही मजुरी मिळालेली नाही. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्य शासनाने लवकरात लवकर केलेल्या कामाच्या मजुरीची रक्कम द्यावी. -वसंत डांगे, मजूर, किर्तांगळी
२५१ कामांवर ८ हजार मजुरांची उपस्थिती
नरेगात कार्यरत असलेल्या तांत्रिक अधिकारी, सहायक कार्यक्रमाधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचा विविध प्रलंबित मागण्यांसाठी १८ जानेवारीपासून संप सुरू होता. त्यामुळे जिल्ह्यात रोहयोच्या कामांची संख्याही मंदावली होती. केवळ घरकुल, गाय गोठा आणि इतर वैयक्तिक स्वरूपाची १८६ कामे ग्रामपंचायत स्तरावर तर यंत्रणेची ६५ अशी २५१ कामे रोहयोमार्फत सुरू आहेत. या कामांवर सध्या ८ हजार मजूर कार्यरत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.