आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील वडांगळीसह विविध यात्रोत्सवासाठी सिन्नर बस आगाराने जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. भाविकांसाठी २७ जादा बसेस सोडण्यात येणार असून १५० फेऱ्यांद्वारे सिन्नरहून यात्रास्थळापर्यंत पोहोच करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानकप्रमुख सुरेश दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आगाराने नियोजन केले आहे. शनिवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कोरोना नंतर प्रथमच भरणाऱ्या यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे भाविकांची पुरेसी संख्या होताच आगारातून बस यात्रा स्थळाकडे रवाना करण्यात येणार आहे. वडांगळीसाठी सात बस : राज्यासह देशातील विविध भागातून वडांगळी यात्रेसाठी बंजारा भाविक येतात. सिन्नर ते वडांगळी मार्गावर भाविकांसाठी सात जादा बस सोडण्यात येणार आहेत. या बसेसद्वारे २४ तास प्रवास सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सतीमाता-सामतदादा हा तीन दिवस यात्रोत्सव असून शंभरहून अधिक फेऱ्या होतील.
जाळीच्या देवासाठी १५ बसेस रवाना
जाळीचा देव यात्रोत्सवासाठी सिन्नर आगारातून १५ बस शनिवारी रवाना करण्यात आल्या. ६७५ भाविक यात्रेसाठी गेले आहेत. सुमारे ३५० किलोमीटरचा प्रवास आहे. यात्रेकरूंचे बारागावपिंप्री येथे स्वागत करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय गोसावी यांनी राजगिरा लाडूचे वाटप केले. चालक वाहकांचा गौरव करून बस रवाना करण्यात आल्या. यावेळी माजी सरपंच शशिकांत उगले, राजेंद्र गोराडे, सोपान पानसरे, नामदेव गोराडे आदी उपस्थित होते.
जेजुरीकरिता तीन जादा बसेस
आगारामार्फत जेजुरीला जाण्यासाठी विशेष बससेवा देण्यात आली आहे. रविवारी तीन बसमधून थेट जेजुरीकरिता प्रवास सेवा देण्यात येणार आहे. दोडी येथील म्हाळोबा यात्रेकरिता नाशिक-पुणे महामार्गावरून जाणाऱ्या बसद्वारे भाविकांची सोय करण्यात येणार आहे. विविध आगाराच्या बस संगमनेर, नारायणगाव, पुणे, नाशिकदरम्यान धावतात. याच बसमधून भाविकांना दोडी येथे जाता येणार आहे. मऱ्हळ येथील खंडोबा महाराज यात्रेसाठी दोन जादा बस सोडण्यात येणार आहेत. या बसच्या यात्राकाळात दिवसभर फेऱ्या सुरू राहतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.