आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:शिक्षणापासून दुरावलेली 417 बालके शैक्षणिक प्रवाहात

भरत घोटेकर | सिन्नर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिशन झिरो ड्रॉप आउट सर्वेक्षणात जिल्ह्यातील १० तालुके आणि नाशिक महानगरपालिका परिसरात मिळून तब्बल ४१७ बालके शाळाबाह्य आढळून आली आहेत. कोरोनातील लाॅकडाऊनमुळे झालेले स्थलांतर, बेताची आर्थिक परिस्थिती आणि अन्य घरगुती कारणास्तव शिक्षणाला रामराम ठोकलेल्या या सर्व बालकांना नजीकच्या शाळेत दाखल करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केले आहे.

राज्याच्या शिक्षण विभागाच्या वतीने ‘मिशन झिरो ड्राॅप आउट मोहिमें’ंतर्गत ५ ते २० जुलैदरम्यान संपूर्ण जिल्हाभरात ६ ते १८ वयोगटांतील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. ग्रामीण आणि शहरी भागात घरोघर जाऊन शिक्षकांकरवी हे सर्वेक्षण पूर्ण झाले. एकही मूल शाळेपासून वंचित राहणार नाही हा या सर्वेक्षणाचा मुख्य हेतू आहे. त्यातूनच ‘डोअर टू डोअर’ जात १५ दिवस करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील तब्बल १० तालुक्यांमध्ये आणि नाशिक महानगरपालिका हद्दीत मिळून ४१७ बालके शिक्षणापासून दूर झाल्याचे आढळून आले.

पाच तालुक्यांत शाळाबाह्य मुलांची संख्या शून्य
देवळा, इगतपुरी, कळवण, पेठ, सिन्नर या पाच तालुक्यांमध्ये त्याचप्रमाणे मालेगाव महानगरपालिका परिसरात एकही मूल शाळाबाह्य नसल्याचे शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला तशी माहिती देण्यात आली आहे. पेठ, कळवण या आदिवासीबहुल तालुक्यात शाळाबाह्य मुले आढळून आली नाहीत. दुसरीकडे बागलाण, दिंडोरी, नाशिक, निफाड, येवला या प्रगत तालुक्यात तसेच नाशिक महानगरपालिका या शहरी भागात शाळा बाह्य मुलांचे वाढते प्रमाण चिंताजनक ठरले आहे.

बागलाण, मालेगावमध्ये सर्वाधिक बालके
शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात बागलाण आणि मालेगाव तालुक्यात सर्वाधिक अनुक्रमे ८६ आणि ८५ बालके शाळेपासून दुरावल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे ६ ते १८ या वयोगटांतील झालेल्या या सर्वेक्षणात १४ ते १८ वयोगटांतील केवळ ३१ बालके असून उर्वरित ६ ते १४ वयोगटातील बालकांना विविध कारणांमुळे शिक्षण सोडल्याचे आढळून आले.

एकही‌ मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही
सर्वेक्षणात आढळलेल्या ४१७ शाळाबाह्य बालकांना जवळच्या शाळेत दाखल करून शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. वयोगटांनुसार त्यांना वर्गात दाखल करून घेतले जात आहे. यापुढेही शाळाबाह्य मुले आढळून आल्यास त्यांना शाळेत दाखल करून घ्यावे, एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. - मच्छिंद्र कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जि. प., नाशिक.

बातम्या आणखी आहेत...