आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:46,747 शेतकऱ्यांना विम्यापोटी मिळाली 14.50 काेटींची भरपाई

सिन्नर / भरत घोटेकर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात खरिपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बदल्यात राज्य सरकारने दिवाळीत नुकसान भरपाई देण्याच्या केलेल्या वल्गना हवेत विरल्या. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा उतरवला, त्या शेतकऱ्यांना मात्र विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई पोटी मिळालेली रक्कम काहीसा दिलासा देणारी ठरली आहे. जिल्ह्यातील ४६ हजार ७४७ शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दावे निकाली निघाले असून त्यांना विमा कंपनीकडून तब्बल १४ कोटी ५० लाख ३२ हजार १६ रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. मालेगाव तालुक्यात सर्वाधिक २० हजार शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे.पेठ आणि इगतपुरी तालुक्यात मात्र एकही शेतकऱ्याने पीक विम्याचा दावा न केल्याने विमा भरपाई मिळण्यात हे दोन्ही तालुके निरंक राहिले आहेत.

जिल्ह्यात बाजरी, कापूस, भुईमूग, मूग, कांदा, ज्वारी, सोयाबीन, मका, उडीद, तूर, नाचणी, भात, कारळे या खरीप पिकांना विमा संरक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीनंतर नुकसान झाल्याची ८१ हजार ५९० तर पीक कापणी पश्चात नुकसानीची १६,१९९ अशा एकूण ९७ हजार ७८९ शेतकऱ्यांनी पिक विमा नुकसान भरपाईसाठी दावे केले आहेत. पैकी विमा कंपनीने नैसर्गिक आपत्तीनंतर झालेल्या नुकसानीचे दावे निकाली काढण्यास प्राधान्य दिले आहे.

त्यापैकी ४६ हजार ७४७ शेतकऱ्यांचे दावे निकाली निघाले आहेत. पिक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून मदतीचा छदाम मिळाला नाही. दुसरीकडे पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना किमान पिक विम्याची नुकसान भरपाई मिळू लागल्याने हा पैसा रब्बी पिकाच्या उभारणीसाठी त्यांना उपयोगात आला आहे.दरम्यान, पीक पेरणीनंतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईचे दावे निकाली काढण्यास कंपनीने प्राधान्य दिले आहे. दुसरीकडे कापणी पश्चात झालेल्या नुकसानीचे दावे मात्र अद्यापही प्रलंबित आहे.

उर्वरित दावे मंजुरीच्या प्रोसेसमध्ये जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती नंतर म्हणजेच अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचे तसेच पीक कापणी नंतर नुकसान झाल्याचे ९७ हजार ७८९ दावे एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीकडे दाखल झाले आहेत. नैसर्गिक आपत्ती नंतरच्या दाव्यांना प्राधान्य देण्यात आले आहेत. त्यापैकी ४६ हजार ७४७ दावे मंजूर झाले आहेत. उर्वरित दावे मंजुरीच्या प्रोसेस मध्ये आहेत. - राजेश गायकवाड, जिल्हा व्यवस्थापक - एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी.

या काळात होतात पिक विम्याचे दावे मंजूर पीक पेरणीनंतर पूर्ण दुष्काळ पडल्यावर, मधल्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर, स्थानिक नैसर्गिक आपत्ती आल्यावर, कापणी पश्चात पिकाचे नुकसान झाल्यावर, महसूल आणि कृषी विभागाच्या पीक कापणी प्रयोगात पिकांची उत्पादकता घटल्यावर पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते.

बातम्या आणखी आहेत...