आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासादायक:सिन्नरला 55 दिवसांनंतर लम्पीच्या संसर्गात 50 तर मृत्यूदरात 30% घट

संपत ढोली | सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर तालुक्यात लम्पीच्या संसर्गात ११ दिवसांत ५० टक्के तर मृत्यूदरात ३० टक्के घट झाली आहे. ५५ दिवसांपासून सातत्याने होणारी वाढ पाहता सध्या पशुपालकांसाठी दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे. ११ दिवसांपूर्वी रोज ४ ते ६ बाधित जनावरे आढळून येत होती. आता हा आकडा २ ते ३ वर आला आहे. ३ डिसेंबरपर्यंत ११ दिवसांत १० जनावरे मृत झाली होती. आता गत ११ दिवसांत ७ मृत्यू झाले आहेत.

पशुपालकांकडून जनावरांचे विलगीकरण केले जात नसल्याने ३ डिसेंबरपूर्वी २२ दिवसांत तब्बल २५८ बाधित जनावरे आढळून आली होती. त्यामुळे तुलनेत संसर्ग ३३ टक्क्यांनी तर मृत्यूचे प्रमाण ६० टक्के वाढले होते. तालुक्यात १०१ टक्के लसीकरण होऊनही संसर्ग व मृत्यू प्रमाण आटोक्यात येत नव्हते. १६ आॅक्टोबरपासून संसर्ग जास्तच वाढला होता. संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी एकाच गोठ्यात तीनपेक्षा जास्त बाधित जनावरे आढळलेल्या पशुपालकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. एकूण ७३१ जनावरे बाधित झाल्याचे आढळून आली आहेत. यापैकी ५४६ पूर्ण बरी झाली आहेत. तर १४४ जनावरांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४१ जनावरे दगावली आहेत.

तालुक्यात लसीकरण १०१ टक्के
१२९ गावांतील ८६ हजार ७०४ जनावरे लसीकरण योग्य आहेत. तालुक्यात आत्तापर्यंत ८७ हजार जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गरजे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी उपचार करत आहेत. पाटोळे, दापूर, खंबाळे, नांदूरशिंगोटे, दुशिंगपूर-घोटेवाडी, देशवंडी, वडझिरे, मोह, वडांगळी, गुळवंच, पाडळी, सरदवाडी, पिंपळे, पांगरी, पंचाळे, गुलापूर, पंचाळे, रामपूर, वडगाव पिंगळा, पाथरे या गावांत लम्पी संसर्ग बाधित जनावरे आढळून आली आहेत.

मदतीसाठी प्रस्ताव सादर
मृत जनावरांच्या मालकांना भरपाई जाहीर केली आहे. गाईकरिता ३० हजार, बैलास २५ तर एक वर्षाआतील वासराला १६ हजार रुपये अशी नुकसानभरपाई देण्यात येत असून त्यासाठी सरकारकडे ३५ प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. आतापर्यंत २९ पशुपालकांना मदत सुपूर्द करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...