आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदलत्या हवामानाचा फटका:बदलत्या हवामानामुळे आंब्यांचे 60% नुकसान; भाववाढीची शक्यता, ढगाळ वातावरणाने मोहर गळाला

हरसूल3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अवकाळीने जळाला तर वाढत्या उष्णतेने फळगळ

त्र्यंबकेश्वर तालुक्यात ६६० हेक्टर क्षेत्रावर एक ला‌ख ७० हजार आंब्याच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक लागवड हरसूल परिसरात झाली आहे. यंदा या आंब्यांना चांगला मोहर आल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून निर्माण होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे हा मोहर गळू लागला आहे. तर काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने बराच मोहर जळाला. त्यातच आता उष्णता वाढू लागल्याने फळगळ सुरू झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचा आनंद क्षणभंगूर ठरला आहे. वातावरणातील बदलामुळे पिकांचे ६० टक्के नुकसान होण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवला आहे. परिणामी यंदा भाववाढ होण्याची शक्यता शेतकरी व व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

वातावरण चांगले असले तर एकरी ७५ ते ८० हजाराचा खर्च येतो, त्यातून चांगले उत्पादन निघाल्यास अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न मिळते. यंदा वातावरण खराब असल्याने खर्चात वाढ होणार असली तरी मोहर गळाल्याने उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन वर्षे लॉकडाऊन असल्याने चांगले फळ येऊनही विक्रीस मर्यादा आल्याने शेतकऱ्यांना फटका बसला होता. यंदा चांगले फळ येण्याची अपेक्षा असताना सततच्या बदलत्या हवामानाचा फटका पिकाला बसत आहे.

शेतकऱ्यांकडून कलमांचीही विक्री
हरसूल परिसरातील मोठे शेतकरी किमान दोन ते पाच हजार आंबा झाडांची कलम करून विक्री करतात. छोटे शेतकरी किमान १०० कलम करून त्याची विक्री करतात. त्यामुळे गावातील इतर नागरिकांना रोजगार मिळतो. या शेतकऱ्यांना कलम विक्रीतून चांगले उत्पन्नही मिळते.

या जातींच्या लागवडीला प्राधान्य
केसर, हापूस, राजापुरी, लंगडा, दशेरी, तोतापुरी अशा अनेक प्रसिद्ध जातींच्या आंब्याचे कलम व फळाचे उत्पादन हरसूल व परिसरात घेतले जाते.

१५०० हजार झाडांवर अडीच किलोही फळही नाही
२०२१ मध्ये हवामानाने चांगली साथ दिल्याने १५०० आंबा झाडावरील मार्चअखेरच्या पहिला खुड्यात अडीच टन माल निघाला होता व भाव ११० रुपये मिळाला होता. परंतु, या वर्षी ढगाळ वातावरण व दोनदा झालेल्या अवकाळीमुळे दीड एकरवरील १५०० झाडांवर पहिल्या बहराचे अडीच किलोसुद्धा फळ हातात नाही. - रघुनाथ लहारे, शेतकरी, चिरापाली

चांगल्या उत्पन्नामुळे आंबा लागवड वाढली
पारंपरिक शेतीपेक्षा फळबागातून चांगले उत्पन्न मिळू लागल्याने त्र्यंबक तालुक्यासह हरसूल परिसरात आंबा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. काही मोठ्या शेतकऱ्यांनी दोन ते तीन हजार झाडांची लागवड केली आहे. काही शेतकरी लागवडीसाठी नियोजन करीत आहेत. त्यामुळे येत्या काळात आंबा लागवडीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दीड एकरात ५ टन उत्पादन
एकरी ७५ हजार रुपयांचा खर्च केला. मागील वर्षी दीड एकरमध्ये पाच टन आंबा नामांकित कंपनीने जागेवर खरेदी केला. त्यातून तीन ते साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळाले. यंदा दोन बहरमुळे आलेल्या फळाची गळ झाली तर दुसऱ्या बहराच्या फळाला बुरशी लागल्याने फळ मेअखेर ताब्यात येईल. त्यामुळे भाव भेटण्याची शक्यता कमी आहे. - अंबादास भोये, उत्पादक, निरगुडे

पहिल्या बहरातील आंब्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता
आंबा गळ झाली असली तरी शिल्लक राहिलेला आंबा चांगला आहे. निर्बंध शिथिल झाल्याने गुजरातबरोबर नाशिक जिल्ह्यातील अनेक व्यापारी हरसूल परिसरात दाखल होतील, त्यामुळे परिसरातील पहिल्या बहरातील आंब्याला चांगला भाव मिळेल. अनेक गावांमध्ये एप्रिलमध्ये आंबा येणार नाही तर दुसऱ्या बहरामधील आंबे एप्रिलअखेर व मे महिन्यात येतील. त्यामुळे त्या आंब्यांना भाव मिळण्याची शक्यता कमी आहे. - मंगेश कांबळे, आंबा व्यापारी

बातम्या आणखी आहेत...