आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणूक तयारी:मालेगाव तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींंसाठी 64 मतदान केंद्र; 350 कर्मचारी नियुक्ती

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात १३ ग्रामपंचायतींची निवडणूक हाेत आहे. प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. रविवारी (दि. १८) ६४ केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. एका केंद्रावर पाच याप्रमाणे ३५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तालुक्यातील माल्हनगाव, शिरसाेंडी, वजीरखेडे, दाभाडी, टाेकडे, राेंझे, जाटपाडे, साैंदाणे, निंबायती, पाटणे, करंजगव्हाण, माेहपाडे व चाैकटपाडे येथे निवडणूक हाेत आहे. या ग्रामपंचायतींच्या ३९ सदस्य तर राेंझेच्या सरपंचपदाची जागा अविराेध झाली आहे. एकूण २२६ उमेदवार रिंगणात आहे. साैंदाणे ग्रामपंचायतीच्या सर्वाधिक १५ जागा अविराेध झाल्या हाेत्या.

आठवडाभरापासून प्रचाराचा उडालेला धुरळा शुक्रवारी थंडावला. तहसील कार्यालयात बुधवारी उमेदवार व प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम मशीन तपासून सील करण्यात आले. नायब तहसीलदार रमेश खैरे, संदीप धारणकर, कर्मचारी राहुल देशमुख, शेखर आहिरे यांनी मतदान यंत्रे सील बंद करण्याची कार्यवाही केली. मतदानासाठी ६४ केंद्रांची व्यवस्था आहे. एका केंद्रावर एक ईव्हीएम मशीन ठेवले जाईल. ६४ कंट्राेल युनिट व ९० बॅलेट युनिटचा वापर हाेणार आहे. प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी व शिपाई असे पाच कर्मचारी नियुक्ती असतील. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पाेलिस बंदाेबस्त तैनात राहणार आहे. शनिवारी सकाळपासून कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वाटप हाेईल.

दाभाडीत चाैरंगी लढत राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या दाभाडी ग्रामपंचायतीसाठी चुरशीची लढत हाेत आहे. भाजप पुरस्कृत कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनल, पालकमंत्री दादा भुसे पुरस्कृत दाभाडी ग्रामविकास पॅनल, उद्धव ठाकरे शिवसेना गट व जनसेवा पॅनलमध्ये चुरस आहे. येथे सरपंचपदासाठी ५ तर सदस्यपदांसाठी ५२ उमेदवार रिंगणात आहे.

बातम्या आणखी आहेत...