आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:खंडेलवाल जैन मंदिरातून 65 हजारांचा ऐवज लंपास

चांदवड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील वरचेगाव लोहार गल्लीतील श्री खंडेलवाल दिगंबर जैन मंदिरात सोमवारी (दि. ५) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून मंदिरातील मूर्तीवरील ६२ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने व दानपेटी फोडून तीन हजारांची रोकड असा एकूण ६५ हजारांचा ऐवज लंपास केला. एकाच रात्रीत चोरट्यांनी शहरातील इतर तीन मंदिरांमध्येही चोरीचा प्रयत्न केल्याने घबराट पसरली आहे.

शहरातील वरचेगाव लोहार गल्लीतील श्री खंडेलवाल दिगंबर जैन मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून सोमवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील मुख्य मूर्तीच्या डोक्यावरील तीन थर असलेले १ किलो वजनाचे ५० हजार रुपये किमतीचे चांदीचे छत्र, ५ हजार रुपये किमतीचे मुख्य मूर्तीच्या समोर ठेवलेली चांदीची पाच फुले, ७ हजार रुपये किमतीचे पाच चांदीचे मुकुट तसेच दानपेटी फोडून त्यातील तीन हजार रुपयांची रोकड असा एकूण ६५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

याच रात्री चोरट्यांनी येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या आवारात असलेल्या मेनगेटजवळील मेघ पार्श्वनाथ जैन मंदिर, गुजराथ गल्लीतील श्री महावीर स्वामी श्वेतांबर जैन मंदिर तसेच सोमवार पेठेतील श्री पगडी गणेश मंदिर (मातीचा गणपती) या मंदिरांमध्येही चोरीचा प्रयत्न केला. याबाबत श्री खंडेलवाल दिगंबर जैन मंदिराचे ट्रस्टी अ‍ॅड. नरेंद्र कासलीवाल यांनी चांदवड पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश चौधरी करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...