आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) योजनेंतर्गत सिन्नर विधानसभा मतदारसंघासाठी ७० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ही योजना कार्यान्वित होताच १४५ गावांतील शेतशिवारात घरगुती व व्यावसायिक वापरासाठी २४ तास थ्री फेज वीज मिळणार आहे. आगामी दोन वर्षांच्या आत हे काम पूर्ण हाेणार आहे. मतदारसंघातील गावांमध्ये सिंगल फेज योजना आहे. तथापि, शिवारातील अनेक वाडी-वस्त्यांवर ही योजना नाही. शिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यालाही घरगुती वापराची अखंडित वीज मिळाली पाहिजे, या भावनेने केंद्र व राज्य सरकारच्या प्रत्येकी ५० टक्के निधीतून आरडीएसएस योजना राबविण्यात येत आहे. त्यातून सिन्नर मतदारसंघात हे काम होण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा आराखडा तयार करून घेतला. हे काम मंजूर झाले असून निविदा प्रक्रिया पूर्ण होताच ते सुरू होणार आहे.
शिवारात बहरेल व्यवसाय
जागा असूनही केवळ विजेच्या उपलब्धतेअभावी शिवारात यंत्रावर चालणारे व्यवसाय सुरू करण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. मात्र, हे काम सुरू होताच वाड्या-वस्त्यांवर व्यवसाय करता येऊ शकणार आहे. शेतीवर आधारित छाेटे-माेठे कारखाने यामुळे सुरू होऊ शकतील.
ग्रामीण भागाच्या विकासाला चालना
केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त तरतुदीतून राबविण्यात येणाऱ्या आरडीसएस योजनेचा आराखडा बनवताना त्यात गावठाणासोबतच वाड्या-वस्त्यांचाही त्यात समावेश करण्याची मागणी ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार कामे मंजूर झाली असून लवकरच ही कामे सुरू होतील. ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल. - माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर विधानसभा
१४५ गावे, वाड्या-वस्त्यांना २४ तास वीज..
आरडीएसएस योजनेचा आराखडा बनविताना गावठाणासोबतच वाड्या-वस्त्यांचाही त्यात समावेश करण्याची सूचना आमदार कोकाटे यांनी २१ सप्टेंबर २०२२ रोजी अधीक्षक अभियंता पडळकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत केल्या होत्या. त्यानुसार या आराखड्यात सिन्नर विधानसभा मतदारसंघातील १४५ गावे व त्यातील वाड्या-वस्त्यांत घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना २४ तास थ्री फेज वीज उपलब्ध करण्याचा समावेश करण्यात आला. त्यासाठी नव्याने ५४ फीडर, २९४ रोहित्रे, जुन्या फीडरवर ६९ एचडीटी बसविण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.