आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पाऊस:इगतपुरी तालुक्यात 2 महिन्यांत सरासरीच्या 72% पाऊस

घोटी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून तालुक्यात २४ तासांत ६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर जून व जुलै या दोन महिन्यांत २४७१ मिलिमीटर पाऊस म्हणजेच सरासरीच्या ७२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी (दि. २३) मध्य रात्रीपासून पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने दारणा, वाकी, भाम, या नद्यांना पूर आला आहे. दारणा नदीच्या पुराचे पाणी परिसरातील शेतामध्ये शिरल्याने भात पिकांचे अतोनात नुकसान झाले. या पूरपरिस्थितीमुळे दारणा धरणातून सकाळी ७ हजार २४४ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.

इगतपुरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच भात शेतामध्ये तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पूर्व भागात झालेल्या पावसामुळे भातलागवडीच्या कामांना चांगला वेग येणार आहे. दारणा, भाम व वाकी नदीचे पाणी शेतात घुसल्याने भाताचे मोठे नुकसान झाले आहे. काहींची भाताची रोपे वाहून गेली आहेत. घोटी परिसरात रविवारी (दि. २४) सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दारणा, भाम व वाकी या नद्या या मोसमात पहिल्यांदा दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. इगतपुरी, घोटी, मानवेढे, वैतरणा, धारगाव, टाकेद या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे सातत्य कायम आहे.

गुजरातमध्ये तयार झालेल्या सिस्टिममुळे पाऊस
गुजरात राज्यात तयार झालेल्या सिस्टिममुळे इगतपुरीसह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला आहे. पुढील चार दिवसांतही चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याचे दिसत असले तरी या पावसाने केवळ जून महिन्याची तूट भरून काढली आहे.
- माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामान तज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...