आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत शहरातील रस्ते विकास प्रकल्पासाठी शंभर कोटीच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निधीतून १९ सिमेंट कॉंक्रिट रस्ते व ३ महत्त्वाच्या पुलांची नव्याने उभारणी होणार आहे. राज्य सरकार ७० टक्के तर उर्वरित ३० टक्के निधी महापालिका खर्च करेल. मालेगावकरांना महाराष्ट्र व कामगार दिनाची ही अनोखी भेट नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपलब्ध करून दिल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.
मंत्री भुसे यांनी सोमवारी (दि.२) शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत मंजूर निधी व कामांचा तपशील सादर केला. भुसे म्हणाले, शहरातील रस्ते विकासासाठी निधी मिळावा म्हणून पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: लक्ष घालून निधी मंजूर करून दिला आहे. या निधीतून महात्मा फुले पुतळा ते शिवाजी महाराज पुतळ्यादरम्यान असलेल्या मोसम नदीवरील दोन्ही पुलांची नव्याने उभारणी केली जाणार आहे. सांडवा पुलाची उंची वाढवून नवीन निर्मिती होणार आहे.
शहराच्या विविध भागातील तब्बल १९ रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे बनविले जातील. राज्य सरकार ६९ कोटी ७८ लाखाचा निधी देणार आहेत. मनपाचा २९ कोटी ९१ लाखाचा सहभाग राहिल. २०२२ हे वर्ष मालेगावसाठी प्रगतीचे ठरत आहे. भविष्यात इतर कामांसाठीही भरीव निधी आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे भुसे यांनी सांगितले. याप्रसंगी मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी, उपमहापौर नीलेश आहेर, ज्येष्ठ नगरसेवक सखाराम घाेडके, रामभाऊ मिस्तरी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.