आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गुरुद्वारातील कीर्तन परंपरेचे तैवानमध्ये दर्शन

मनमाड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यवसायानिमित्त तैवानमध्ये स्थायिक झालेल्या मनमाडच्या कांत परिवाराने तैवानमध्ये श्री गुरुनानक जयंती साजरी करून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. विशेष म्हणजे, तैवानमध्ये गुरुद्वारा नसल्याने मनमाडच्या गुरुद्वाराच्या सहकार्याने येथील गुरुद्वारातील धार्मिक कार्यक्रमांचे थेट प्रेक्षेपण तैवानमध्ये ऑनलाइन दाखवण्यात आले. त्यामुळे तेथील भाविकांनाही भारतीय सण, उत्सव व परंपरेची माहिती घेता आली.

येथील गुरुदीपसिंग कांत आणि व्यवसायानिमित्ताने तैवानमध्ये स्थायिक झालेली त्यांची मुले गुरुविंदसिंग कांत आणि मनविंदसिंग कांत यांनी श्री गुरुनानक देवजी यांच्या जयंती उत्सवाचे, तसेच गुरुवाणी, लंगर व महाप्रसादाचे तैवान येथे आयोजन केले होते. तैवानमध्ये गुरुद्वारा नसल्याने श्री गुरुनानक जयंती कशी साजरी करायची असा प्रश्न पडला असता यावर कांत परिवाराने श्री गुरुनानक जयंती साजरी करण्यासाठी पुढाकार घेतला. या जयंतीला सहकार्य मिळावे यासाठी मनमाडच्या प्रसिद्ध गुप्तसर साहिब गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा रणजीतसिंगजी यांना सांगून त्यांच्याकडून परवानगी घेत गुप्तसर साहिब गुरुद्वारा सहकार्याने मनमाड येथील गुरुद्वाराच्या दरबारामधील होणाऱ्या प्रत्येक धार्मिक कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण तैवानमध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी करण्यात आले.

त्यामुळे तैवानमध्ये असलेल्या शीख बांधवांना मोठ्या उत्साहात श्री गुरुनानक जयंती साजरी करता आली आणि आनंद घेता आला. मनमाड गुरुद्वाराचे ग्रंथजी दलेरसिंग सोनी यांना तैवान येथील श्री गुरुनानकजी जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी आणि तैवान देशात येण्यासाठी तैवान सरकारने विशेष परवानगी दिली होती. त्यांना विजाही मंजूर करून देण्यात आला होता.

मनमाड येथील कांत परिवाराने श्री गुरुनानकजी जयंतीनिमित्त कीर्तन, प्रवचन, लंगर आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या देशाच्या भारतीय संस्कृतीचे दर्शन तैवान येथील नागरिकांना करून दिले, या कार्यक्रमाला भागातील सुमारे ३०० नागरिक उपस्थित होते. शीख समाजाची ओळख असणारी पगडी कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना बांधण्यासाठी देखील खास येवला येथून कलाकार राजवंश सिंग आणि रणजित सिंग यांना नेण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...