आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपींना अटक नाही:पत्रकार वाघ हल्ला प्रकरणातील आरोपी फरार

मालेगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पत्रकार शंकर वाघ यांच्यावर झालेल्या हल्ल्याला आठ दिवस उलटूनही अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. दुसरीकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मालेगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने अायोजित केलेल्या धरणे आंदोलनालाही पोलिसांनी परवानगी नाकारल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरली आहे.

गुरुवारी (दि.१६) सटाणा रोडवरील वैद्य हॉस्पिटलजवळ झालेल्या गर्दीचे पत्रकार वाघ हे मोबाइलने छायाचित्र टिपत असताना पप्पू कासवे व विक्की पाटील यांच्यासह १५ ते २० जणांनी त्यांना वृत्तांकन करण्यास विरोध करत हल्ला केला होता. दमदाटी करत मोबाइलमधील छायाचित्रे नष्ट केली होती. या प्रकरणी वाघ यांनी छावणी पोलिस ठाण्यात पत्रकार स्वसंरक्षण कायद्यांतर्गत फिर्याद दिली. या घटनेचा जिल्हाभरातील पत्रकारांनी निषेध करत स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना निवेदने दिली. मालेगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलिस उपअधीक्षक प्रदीप जाधव यांना निवेदन दिले. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली. मात्र, या घटनेला आठ दिवस उलटूनही आरोपींना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिक व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार संघाने गुरुवारी (दि.२३) गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे पोलिस आरोपींना पाठीशी घालत असून पत्रकारांना लोकशाही मार्गाने आपल्या भावना व्यक्त करण्यासही मज्जाव करत असल्याचा आरोप केला जात आहे. पोलिस दबावाखाली? हल्लेखोरांना आठ दिवस उलटूनही अटक नाही. मुळात हल्लेखोर एका राजकीय संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते असल्याचे देखील सांगितले जात आहे. त्यामुळे संघटनेतील नेत्यांच्या दबावाखाली पोलिस कारवाई करण्यास धजावत नाहीत का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

पाेलिस अधीक्षकांच्या चौकशीच्या सूचना
पत्रकार शंकर वाघ यांच्यावर झालेल्या हल्ल्याची पाेलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दखल घेत अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांना चाैकशी संदर्भात सूचना केल्या अाहेत.

पोलिसांना भीती कशाची?
पत्रकार संघाने सनदशीर व शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलनासाठी परवानगी मागितली होती. मात्र छावणी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे कारण देत परवानगी नाकारली. पत्रकारांनी शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन केल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, अशी एकही घटना राज्यात झालेली नाही. त्यामुळे पोलिस नक्की कोणत्या भीतीच्या सावटाखाली आहेत, हे अनुत्तरित आहे.