आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारकाच्या झालेल्या निकृष्ट कामासंदर्भात खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.३) सर्वपक्षीय पदाधिकारी, प्रशासक, मुख्याधिकारी यांची संयुक्त बैठकीत संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिल्यानंतर पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर तीन दिवसांपासून यासंदर्भात सुरू असलेले उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.
देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारकाच्या निकृष्ट कामाची तात्काळ चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक मनोज सोनवणे यांनी मंगळवार (दि.२९) पासून नगरपालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण सुरू केले होते. गुरुवारी (दि.१) दुपारी मुख्याधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यामुळे स्थगित करण्यात आले.
दरम्यान, सकाळी अकरा वाजता शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संघटना, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने पालिकेच्या कार्यालयाजवळ जमा होऊन मुख्याधिकाऱ्यांना त्यांच्या दालनात घेराव घालण्यात आला. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ नेते देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रमेश देवरे, श्रीधर कोठावदे, माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, माजी नगरसेवक साहेबराव सोनवणे, काँग्रेसचे किशोर कदम, पांडुरंग सोनवणे, शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे, ज.ल. पाटील, राजेंद्र सोनवणे, आनंद सोनवणे, शरद शेवाळे आदींनी स्मारकाच्या कामासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला.
स्मारकाच्या आतापर्यंत आत्तापर्यंत झालेल्या कामाची सविस्तर माहिती देण्याचा आग्रह धरला. यावेळी पालिकेच्या अभियंत्यांनी झालेल्या खर्चाची दिलेली माहिती अतिशय धक्कादायक व अवास्तव असल्याचे निदर्शनास आणून देत या कामाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वानुमते करण्यात आली. दरम्यान, यासंदर्भात माजी आमदार संजय चव्हाण व रमेश देवरे यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून शनिवारी (दि.३) सायं. सहा वाजता नगरपालिका कार्यालयात बैठक घेऊन स्मारकाच्या कामासंदर्भात योग्य तो निर्णय घेऊन पुढील दिशा ठरविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
आत्तापर्यंत झालेला खर्च संशयास्पद
स्मारकाच्या कामासंदर्भात निघालेल्या निविदेमध्ये लाकडी सरई बदलून सागवानी सरई टाकणे, कौले बदलणे असा उल्लेख असताना कौलांना केवळ रंगरंगोटी करण्यात आली व निलगिरीच्या जुन्याच लाकडी सरई पुन्हा वापरण्यात आल्या असूनही आत्तापर्यंत झालेला खर्च हा संशयास्पद असल्याचा आरोप उपाेषणकर्त्यांनी करून चौकशीची मागणी केली आहे.
अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्मारकाच्या गेटला सील
उपाेषणाच्या तिसऱ्या दिवशी माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, साहेबराव सोनवणे, किशोर कदम, शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे यांची स्वाक्षरी करून नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन बागुल, पालिकेचे प्रशासकीय अधिकारी विजय देवरे यांच्या उपस्थितीत देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारकाच्या गेटला सील करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.