आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनवणे जळीतकांड:अपर जिल्हाधिकारी सोनवणे जळीतकांड; तीन आराेपींना अकरा वर्षांनंतर जन्मठेप

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगावचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी यशवंत साेनवणे जळीतकांड खटल्यातील तीन आराेपींना मालेगाव अपर व सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. इतर दाेन गुन्ह्यांमध्येही तिघांना दाेषी ठरवण्यात आले. घटनेच्या ११ वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला. राजेंद्र देवीदास शिरसाठ ऊर्फ राजू, मच्छिंद्र पिराजी सुराडकर ऊर्फ कचरू व अजय मगन साेनवणे (सर्व रा. मनमाड) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला २५ जानेवारी २०११ रोजी मनमाडजवळील पानेवाडी शिवारात इंधन भेसळ अड्ड्यावर छापा टाकण्यास गेलेले यशवंत साेनवणे यांना पाेपट शिंदे व त्याच्या साथीदारांनी अंगावर राॅकेल टाकून जिवंत जाळले हाेते. यात मुख्य संशयित पाेपट हादेखील भाजला हाेता.

काही दिवसांनी मुंबईत उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला हाेता. या प्रकरणात मनमाड पाेलिसांनी पाेपट शिंदे, कुणाल शिंदे, विकास शिंदे, दीपक बाेरसे, राजेश शिरसाठ, सीताराम भालेराव, मच्छिंद्र सुराडकर यांच्यासह अकरा जणांवर गुन्हा दाखल केला हाेता. कुणाल शिंदे अल्पवयीन असल्याने त्याचा खटला बालन्यायालयात सुरू हाेता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने या खटल्याचा तपास सीबीआयकडे साेपवला हाेता. सीबीआयने तपास पूर्ण करत तिघांविराेधात आराेपपत्र दाखल केले हाेते. खटल्याच्या सुनावणीत अपर व जिल्हा सत्र न्यायाधीश डी. वाय. गाैड यांनी तिघांना दाेषी ठरवले.

खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने जन्मठेप व दाेन हजार रुपये दंड, सरकारी कामात अडथळा आणल्याने दाेन वर्षे कारावास, हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने कारावास, धमकावल्याच्या आराेपाखाली सात वर्षे शिक्षा तसेच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने कैद अशी शिक्षा दोषींना सुनावण्यात आली. या तिन्ही शिक्षा एकाचवेळी भाेगायच्या आहेत. सीआयडीचे वकील नमाज चालन यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. आरोपींच्या वतीने वकील राहुल कासलीवाल व सागर गरुड यांनी काम पाहिले.

आराेपींना मिळाला हाता जामीन : या प्रकरणात विशेष पाहिलस महानिरीक्षकांनीच आराेपींना मक्का लावला हाेता. मक्का न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश श्रीमती एम. एस. जवळकर यांनी २५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सात जणांचा जामीन मंजूर केला हाेता. सीबीआयची आराेपींना बंदिस्त ठरवण्यासंदर्भातील अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला हाेता. शिक्षा झालेले तिघेही आराधी सध्या जामिनावर बाहेर हाेते.

शिक्षा सुनावताच छातीत कळ : न्यायाधीश गाैड यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावताच आराधी मच्छिंद्र सुराडकर याच्या छातीत कळ आली. त्याने त्रास हाते असल्याचे सांगताच त्याला तातडीने उपचारासाठी सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. डाॅक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात आणण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...