आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाही महिन्यांपूर्वी भाजपमधून उद्धव ठाकरे यांच्या गटात गेलेल्या अद्वय हिरे यांच्या अडचणी वाढताना दिसून येत आहेत. अद्वय हिरे यांच्या कुटुंबियांसह 32 जणांविरोधात फसवणूक व दिशाभूल केल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या पोलिस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवसेनेच्या फुटीनंतर दादा भुसे शिंदे सेनेसोबत गेले. त्यांची भाजपशी युती झाली. या घडामोडीमुळे भुसेंविरोधात जोरदार आघाडी उघडणाऱ्या डॉ. अद्वय हिरे यांची कोंडी झाली होती. त्यामुळे त्यांनी शेवटी ठाकरे गटाला जवळ केले. मात्र आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.
अद्वय हिरे यांच्यावर पहिला गुन्हा रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्था यावर सुमारे 32 कोटींची जिल्हा बँकेची थकबाकी आणि दिशाभूल केल्याप्रकरणी आयेशा नगर पोलिस स्थानकात दाखल करण्यात आला आहे. दुसरा गुन्हा महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समितीमध्ये शिक्षकाची नोकरी लावून देण्याच्या फसवणूक केल्या प्रकरणावरुन मालेगाव कॅम्प पोलिस स्थानकात दाखल झाला आहे.
भाजपचे हिरे ठाकरेंचे कसे झाले?
दादा भुसे यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाने अद्वय हिरे यांना मैदानात उतरवले आहे. 2014 मध्ये अपूर्व आणि अद्वय या दोन्ही बंधूनी कमळ हाती घेऊन आपली कारकीर्द सुरु केली होती. 2019 मध्ये अपूर्व हिरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळीही अद्वय हिरे भाजपमध्येच राहिले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अद्वय यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली. मात्र शिंदे गट आणि भाजप एकत्र आल्याने दादा भुसे यांच्याशी जमवून घेणे त्यांना जड जाणार होते. तसेच पुन्हा निवडणुकीची संधी मिळण्यासाठी त्यांनी भाजपला रामराम केला.
सूडाची भावना
याप्रकरणी अद्वय हिरे यांचे बंधु अपूर्व हिरे यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, संबंधित केस आठ वर्षे जुनी असून त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. अशाप्रकारे पुन्हा गुन्हा नोंदवणे हे बेकायदेशीर असून यापाठीमागे फक्त आकस आणि सूडाची भावना स्पष्टपणे दिसून येत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.