आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्काजाम:महामार्ग राेखत पालकमंत्र्यांच्या राजीनाम्याची सर्वपक्षीय मागणी

मालेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वत:ला जनतेचा सालदार म्हणणारा आज शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे, आंदाेलकांना तीनपाट हिणवणाऱ्याला जनतेने सत्तेचा पाट दिला आहे, अहंकारी रावणही संपला हे ध्यानात ठेवा, शेतकऱ्यांना विष पिऊन आत्महत्या करण्यास भाग पाडाल तर परिणाम भाेगण्यास तयार रहा, अशा शब्दांमध्ये जहरी टीका करत मुंबई-आग्रा महामार्ग राेखत पालकमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची सर्वपक्षीयांकडून जाेरदार मागणी करण्यात आली. चाळीसगाव फाट्यावर साेमवारी (दि. ५) दुपारी चक्काजाम आंदाेलन करत बाेरी अंबेदरी व दहिकुटे धरणांच्या बंदिस्त कालवा प्रकल्पांना विराेध दर्शविण्यात आला.

बाेरी अंबेदरी बंदिस्त कालव्याचे काम थांबविण्याच्या मागणीसाठी स्थानिक शेतकऱ्यांचे एक महिन्यापासून आंदाेलन सुरू आहे. राजकीय दबावामुळे प्रशासकीय यंत्रणा बंदिस्त कालव्याचे काम रेटण्याचा प्रयत्न करत असल्याने गणेश कचवे या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन केले. तर काकाजी कचवे या शेतकऱ्याने थेट भुसेंच्या संपर्क कार्यालयात घुसून आत्महत्येचा प्रयत्न केला.

या दाेन्ही घटनांमुळे संतापाची भावना निर्माण झाल्याने शिंदे गट वगळून सर्वपक्षीयांनी चक्काजाम आंदाेलनाची हाक दिली हाेती. त्यानुसार भाजप, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सामाजिक संघटनांनी आंदाेलनात सहभाग घेतला. जनतेची गैरसाेय हाेवू नये म्हणून प्रारंभी चाळीसगाव फाट्यावर रस्त्याच्या कडेला ठिय्या देण्यात आला.

यावेळी भाजप नेते अद्वय हिरे, बाराबलुतेदार मंडळाचे बंडूकाका बच्छाव, माजी नगरसेवक सुनील गायकवाड, काँग्रेसचे प्रसाद हिरे, सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार, देवा पाटील, प्रहार संघटनेचे शेखर पगार आदिंनी पालकमंत्री भुसेंवर जाेरदार शरसंधान साधले. शेतकरी हितासाठी एकजूट कायम ठेवत येणाऱ्या काळात पुढील आदाेलनाची दिशा ठरविण्यावर सर्वांनी एकमत व्यक्त केले. यानंतर आंदाेलकांनी थेट मुंबई-आग्रा महामार्गावर आंदाेलन केले.

भुसेंविराेधातील फलक झळकावून घाेषणाबाजी केली. अपर पाेलिस अधीक्षक अनिकेत भारती व प्रभारी तहसीलदार कैलास पवार यांनी मागणीचे निवेदन स्विकारले. आंदाेलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. तुषार शेवाळे, डाॅ. राजेंद्र ठाकरे, विनाेद शेलार, मदन गायकवाड, मनमाेहन शेवाळे, याेगेश बागूल, अतूल खैरनार, दीपक गायकवाड, बंडू पवार, प्रीतेश पवार, भूषण कचवे, शरद शिंदे, भरत पाटील, गुलाब पगारे यांच्यासह पक्षांचे पदाधिकारी व शेतकऱ्यांसह महिला सहभागी झाल्या हाेत्या.

भुसेंची मदत नाकारली
विष प्राशन केलेल्या गणेश कचवे यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पालकमंत्री भुसे यांनी कचवे यांची भेट घेत उपचाराचा खर्च करण्याची तयारी दर्शविली. मात्र, संबंधित कचवे कुटुंबियांनी त्यांची मदत नाकारल्याची माहिती देवा पाटील यांनी आंदाेलनावेळी दिली. कचवे यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शेतकरीच करतील, अशी घाेषणा पाटील यांनी केली.

..तर अधिवेशनावर माेर्चा
भुसेंच्या मनमानीला चाप लावण्यासाठी हिवाळी अधिवेशनात बंदिस्त कालव्यांचा प्रश्न उपस्थित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. सांगून समजत नसेल तर थेट नागपूरला अधिवेशनावर माेर्चा काढण्याची तयारी असल्याचे सुनील गायकवाड यांनी सांगितले. तर ठेकेदारधार्जिणे निर्णय हाणून पाडू, असा इशारा बंडूकाका बच्छाव यांनी दिला.

भुसे यांच्यावर टीका
भाजप नेते अद्वय हिरे यांनी भुसेंवर टीका केली. तालुक्यात ७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा शेतकऱ्यांना महिनाभर आंदाेलन करण्याची दुर्दैवी वेळ आली. हिरे यांनी भुसे यांना पप्पू व फेकू म्हणून संबाेधले. झाेडगेजवळ जमीन कुणी खरेदी केली आहे, कुणाला फॅक्टरी उभारायची आहे हे अगाेदर भुसेंनी स्पष्ट करावे, असे हिरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...