आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:पिंगळवाडेत सार्वजनिक शौचालय पाडल्याने संताप; शौचालय उपलब्ध करून देण्याचे आश्वासन

सटाणा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंगळवाडे येथे ग्रामपंचायतीने आदिवासींसाठी बांधलेले सार्वजनिक शौचालय संबंधिताने बेकायदेशीररित्या जेसीबीने जमीनदोस्त केल्याच्या निषेधार्थ सोमवारी संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.

पिंगळवाडे (ता. बागलाण) येथील गावालगत असलेल्या आदिवासी वस्तीत राहणाऱ्या महिलांसाठी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले होते. मात्र हे शौचालय जेसीबीच्या सहाय्याने पाडून टाकले आहे. ग्रामपंचायतीने तत्काळ महिलांसाठी शौचालय उभारावे व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास संतप्त महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल केला.

यावेळी महिलांनी ठिय्या देऊन सरपंच लताबाई भामरे, ग्रामसेवक सुनील ठोके यांच्यासह सदस्यांना शौचालय का पाडले याचा जाब विचारून आम्हाला जोपर्यंत शौचालय बांधून देत नाही, तोपर्यंत ठिय्या मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. मात्र प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून निषेध केला. आंदोलनात बेबीबाई माळी, फुलाबाई पवार, अन्साबाई सोनवणे, हिरूबाई तलवारे, शेवंताबाई पवार, बायजाबाई शिंदे, मनीषा मोरे, चंद्रकांत शिंगरे, मनीषा गांगुर्डे आदी सहभागी झाले होते.

शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
^ग्रामपंचायतीने आदिवासी महिलांसाठी शौचालय बांधले होते. मात्र, गावातील एका शेतकऱ्याने बेकायदेशीररित्या पाडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले आहे. सरपंच व ग्रामसेवकाला संबंधित शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कारवाईत कसूर केल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होईल. शौचालयाची सुविधा तातडीने उपलब्ध करण्यात येईल. - पांडुरंग कोल्हे, गटविकास अधिकारी, बागलाण

बातम्या आणखी आहेत...