आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालखी सोहळा:साडेतीन एकरवर पार पडले रिंगण; अश्वाच्या पायाखालची धूळ भाळी लावत पालखी पंढरीकडे मार्गस्थ

सिन्नर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पांडुरंग भेटीची आस मनी धरून, सोबतीला दिंड्या-पताका घेत टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातील पहिले-वहिले रिंगण शुक्रवारी (दि. १७) दुपारी ४.३० च्या सुमारास दातली शिवारात अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडले.

मानाचा अश्व रिंगणात धावू लागताच पताका, विणा घेतलेले वारकरी, तुळशीवृंद डोईवर घेतलेल्या महिला रिंगणात अश्वापाठोपाठ धावू लागल्या. अनेकांनी मानाचा अश्व रिंगण पूर्ण करून गेल्यानंतर त्याच्या पायाखालची धूळ भाळी लावली. भजन-आरती झाल्यानंतर पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाला.कोरोना महामारीमुळे रिंगण सोहळ्याला दोन‌ वर्षे खंड पडला होता. मात्र यावर्षी शासनाने वारीला परवानगी दिल्याने हा अपूर्व सोहळा वारकऱ्यांसह परिसरातील जवळपास हजारो भाविकांनी डोळ्यात साठविला.

दातली शिवारात लक्ष्मण रामभाऊ शेळके व कैलास रामभाऊ शेळके यांच्या मालकीच्या गट नंबर ३६० मधील साडेतीन एकर क्षेत्रावर हा रिंगण सोहळा पार पडला. निवृत्तिनाथांच्या पालखी सोहळ्यात यंदा पाचव्या वर्षी गोल रिंगण होत असल्याने वारकऱ्यांसह भाविकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता. हजारो वारकऱ्यांनी टाळ, मृदंगाच्या तालावर आणि हातात भगवे ध्वज, पताका घेऊन ‘ज्ञानोबा तुकाराम...’च्या गजरात धरलेला ठेका... पताकाधारी, विणेकरी, टाळकरी आणि मृदंगवादकांचा फेर... विठ्ठलनामाच्या जयघोषात मानाच्या अश्वाने सलामी देत केलेली तीन रिंगणे आणि हात उंचावत विठूनामाच्या भक्तीत तल्लीन झालेले हजारो वारकरी... असा हा अवघ्या सिन्नरकरांच्या डोळ्याची पारणे फेडणारा ठरला.

निवृत्तिनाथ महाराज संस्थानचे मुख्य प्रशासक अधिकारी ॲड. भाऊसाहेब गंभीरे, माजी अध्यक्ष पंडित महाराज कोल्हे, संजय महाराज धोंडगे, रामकृष्ण महाराज लहवितकर, महंत तुलसीदास महाराज गुट्टे, जयंत महाराज गोसावी, बाळकृष्ण महाराज डावरे, शिवा महाराज आडके, सुदाम महाराज काळे, एकनाथ महाराज गोळेसर, किशोर महाराज खरात, भगीरथ महाराज काळे, योगेश महाराज आव्हाड, जालिंदर महाराज दराडे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा अपूर्व उत्साहात पार पडला.

दातलीसह केदारपूर, शहापूर, मुसळगाव, कुंदेवाडी, खंबाळे, दोडी, मऱ्हळ, निऱ्हाळे आदींसह तालुक्यातील विविध गावांतून भाविकांनी रिंगण सोहळा बघण्यासाठी आणि दर्शनासाठी गर्दी केली होती. आरंभी मानाच्या अश्वाची पालखीतील पादुकांशी भेट घडविण्यात आली.त्यानंतर‘ज्ञानोबा माउली... तुकाराम...’, ‘निवृत्तिनाथ महाराज की जय’...असा जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर व वारकरी महिलांच्या फुगड्या अशा उत्साहपूर्ण वातावरणात सुमारे तासभर हा रिंगण सोहळा पार पडला. मुसळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली.

वारीमध्ये हजारो वारकरी
लोणारवाडीतील मुक्काम हलवून सकाळी पालखी मार्गस्थ झाली. सिन्नर शहरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर कुंदेवाडी येथे दुपारचे जेवण घेऊन दातलीत दुपारी ४ च्या सुमारास दिंडीचे आगमन झाले. ४.३० वाजता रिंगण सोहळ्याला आरंभ झाला. प्रथम मानाच्या अश्वाचे, त्यानंतर पखवाज, झेंडेकरी, विणेकरी-तुळशीवाले याप्रमाणे रिंगण पार पडले. मानाचा अश्व रिंगण सोहळ्यात धावला. विठूरायासह निवृत्तिनाथांचा असे दोन अश्व धावले. कोरोना महामारीमुळे वारीत दोन वर्षांचा खंड पडल्याने यावर्षी मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी दिंडीमध्ये सहभागी होऊन पंढरीची वाट धरली.

बातम्या आणखी आहेत...