आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:लोधाईमाता टेकडीवर मोरांसाठी कृत्रिम पाणवठा; वनसमिती पदाधिकारी व वनकर्मचाऱ्यांकडून स्वखर्चातून टँकरने पाणी

चांदवड, वडनेरभैरवएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वडनेरभैरव येथील लोधाईमाता टेकडी वनपरिसरातील मोरांसाठी वनसमिती व वडनेरभैरव वनपरिमंडळातील वन कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून कृत्रिम पाणवठा तयार केला आहे. या पाणवठ्यात टँकरने पाणी टाकण्यात येत असल्याने ऐन उन्हाळ्यात परिसरातील मोरांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

वडनेरभैरव येथील लोधाईमाता टेकडी परिसरात मोरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र मोरांना ऐन उन्हाळ्यात पाणी उपलब्ध होत नसल्याने पाणी पिण्यासाठी त्यांना परिसरातील शेती क्षेत्राकडे जावे लागत होते. त्यातच वनक्षेत्राच्या भोवती मालकी क्षेत्रात द्राक्षबागा असल्याने मोरांच्या मागे कुत्रे लागल्यास त्यांना द्राक्षबागेतील ड्रीपच्या नळ्यांमुळे पळताही येत नव्हते.

त्यामुळे मोरांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी वनसमितीच्या मागणीप्रमाणे लोधाईमाता वनसमिती व वडनेरभैरव वनपरिमंडळातील वनकर्मचाऱ्यांनी मागील वर्षी स्वखर्चाने वनक्षेत्रात कृत्रिम पाणवठा तयार केला. त्यात टँकरने पाणी टाकल्यामुळे गेल्या वर्षभरात परिसरातील मोर पाणी पिण्यासाठी शेती क्षेत्राकडे गेले नाहीत. त्यामुळे या परिसरातील एकाही मोराचा उष्माघाताने अथवा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला नाही. शुक्रवारी (दि. ८) लोधाईमाता वनसमिती व वनकर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने कृत्रिम पाणवठ्यात पाणी टाकले.

यावेळी लोधाईमाता वनसमितीचे सुरेश सलादे, दत्ता शिंदे, सोमनाथ निफाडे, चांदवड वनपरिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे, वडनेरभैरव वनपरिमंडळ अधिकारी देवीदास चौधरी, वडनेरभैरवचे वनरक्षक विजय टेकनर, वनमजूर वसंत देवरे, वाहनचालक अशोक शिंदे आदी उपस्थित होते.