आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक येथील अल्पवयीन १० वर्षीय दोन बालके सायखेडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत आढळून आल्याने त्यांची विचारपूस करत त्यांना पालकांच्या ताब्यात दिले. मुले सापडल्याने पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. रविवार (दि. १२) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नाशिक-छत्रपती संभाजीनगर राेडवर चेहेडी (ता. निफाड) शिवारात रस्त्याच्या मधोमध दुभाजकावरून मुलगा आयुष विनोद साबळे (१०, रा. हिरावाडी, नाशिक), खुशी ऊर्फ धनश्री रमेश सातपुते (१०, हिरावाडी, नाशिक) ही दोन्ही अल्पवयीन मुले धोकादायकरित्या पायी जाताना चेहेडी ग्रामस्थांना मिळून आले. ग्रामस्थांनी पोलिसांना कळवून त्यांना तत्काळ सायखेडा पोलिस स्टेशनमध्ये आणले. सहायक पोलिस निरीक्षक पी. वाय कादरी यांनी त्यांना प्रेमाने जवळ घेतले.
मुले उपाशी असल्याचे जाणवल्याने त्यांना अल्पोपाहार देण्यात आला. त्यानंतर मुलांकडे विचारपूस केली असता मुलगा आयुष यास वडील तीन दिवसांपूर्वी रागावले होते. त्यामुळे रविवारी दुपारी १ वाजता दोन्ही मुले हिरावाडी, नाशिक येथून घराबाहेर पडल्याचे सांगितले. दोन्ही मुले हिरावाडी येथून पायी नांदूरनाका, ओढा, शिलापूरमार्गे चेहेडी येथे २० किलोमीटर अंतर चालत आले. मुलांकडून मोबाइल नंबर प्राप्त करून पालकांशी संपर्क केला. पालक पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेलेले होते. पंचवटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कोल्हे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पालकांना सायखेडा येथे पाठविले. मुलांना बघताच पालकांनी त्यांना कवेत घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.