आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय पक्षांनी यासाठी सहकार्य करावे:आधार प्रमाणिकरणासाठी सहकार्य करा;  नायब तहसीलदार वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नरला पदाधिकाऱ्यांची बैठक

सिन्नर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधार प्रमाणिकरण ऐच्छिक असले तरी मतदारांमध्ये याबाबत जागृती निर्माण होणे आवश्यक आहे. राजकीय पक्षांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक नायब तहसीलदार विलास वैद्य यांनी केले.

मतदार यादीला आधार प्रमाणिकरण करण्यासाठी सिन्नर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. २) राजकीय पक्षांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. सिन्नर तालुक्यात २ लाख ९७ हजार ५७४ इतके मतदार आहेत. या मतदारांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी १ ऑगस्ट २०२२ ते १ एप्रिल २०२३ पर्यंत मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड यांच्या संलग्नीकरणामुळे मतदारांच्या ओळखीचे प्रमाणिकरण होणार आहे. त्याचबरोबर एकापेक्षा अधिक मतदारसंघात असणाऱ्या बोगस नावांना आळा बसण्यास मदत होईल. एका मतदाराचे नाव एकाच मतदारसंघात राहील. निवडणूक मतदानासंबंधीची विद्यमान माहिती व आयोगाकडून वेळोवेळी प्रसारित होणाऱ्या सूचना मतदारांना मोबाइलद्वारे अवगत करणेही सोपे होणार आहे. त्याच उद्देशाने निवडणूक आयोगाने आधार प्रमाणिकरण मोहीम हाती घेतल्याची माहिती वैद्य यांनी यावेळी दिली. ऑनलाइन पद्धतीने अर्ज क्रमांक ६ (ब) भरून मतदार आधार क्रमांक नोंदवू शकतात. या आधार क्रमांकाला जोडलेल्या मोबाइलवर ओटीपीद्वारे आधारचे प्रमाणिकरण होईल. तथापि, तपशीलात फरक असल्यास प्रामाणिकरण होणार नाही. मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विविध स्वरूपात आधार क्रमांक मिळवण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी यांना वैधानिकरत्या प्राधिकृत करण्यात आले आहेत. ऑफलाइन पद्धतीने अर्जाद्वारे मतदारांना आधार प्रमाणीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाडे, प्रशांत रायते, सिटूचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ तांबे, नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी रोहित पगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलेश जगताप, अनिल वराडे, विजय वाजे, बाळा शिंदे आदींसह राजकीय पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...