आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्षाची ठिणगी:बाेरी अंबेदरीच्या बंदिस्त कालवा समर्थकांचा 12 ला रास्ता राेकाे ; गाव बंद ठेवून आंदोलनाचा निर्णय

मालेगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाेरी अंबेदरी धरणाऱ्या बंदिस्त जलवाहिनीस विराेध दर्शवत स्थानिक शेतकऱ्यांचे महिनाभरापासून आंदाेलन सुरू आहे. तर आता बंदिस्त जलवाहिनीची प्रस्तावित लाभार्थी गावे प्रकल्पाच्या समर्थनार्थ एकवटली आहेत. बंदिस्त कालव्याचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी १२ डिसेंबरला गाव बंद ठेवून सकाळी १० वाजता रास्ता राेकाे करण्यात येणार आहे. गुरुवारी झाेडगे येथे झालेल्या स्थानिक सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय झाला.

बंदिस्त कालव्याला काही शेतकरी गैरसमजुतीतून विराेध करत असल्याची भावना झोडगे येथील बैठकीत व्यक्त करण्यात आली. पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नातून बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पासाठी राज्य शासनाने १७ काेटी ८५ लाखाचा निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पामुळे माळमाथ्यावरील अल्पवृष्टी असणाऱ्या झाेडगे, दहिदी, राजमाने, माेहपाडा, जळकू, लखाणे, अस्ताणे गावांना लाभ हाेणार असल्याचा दावा केला जातो. कालव्याचे बंद पडलेले काम सुरू करण्याच्या मागणीसाठी १८ नाेव्हेंबरलाच रास्ता राेकाे केले जाणार हाेते. मात्र, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी चार दिवसांत काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले हाेते. परंतु, अद्याप काम सुरू झालेले नाही. त्यामुळे हे स्थगित आंदोलन १२ डिसेंबरला केले जाणार आहे.

यास स्थानिक सर्वपक्षीयांनी एकजूट दाखविण्याचे आवाहन बैठकीचे करण्यात आले. बैठकीला माजी सरपंच दीपक देसले, माजी उपसरपंच नथू देसले, सरपंच चंद्रकांत साेनजे, उपसरपंच बेबाबाई देसले, माजी पं.स. सदस्य विजय देसले, शरद देसले, प्रकाश काळगुडे, मुकेश गवांदे, ज्ञानेश्वर देसले, किरण देसले यांच्यासह राजमाने, अस्ताने, कंधाणे, जळकू, लखाणे व झाेडगे भागातील शेतकरी उपस्थित हाेते.

आंदाेलनाचा वार साेमवार गेल्या साेमवारी प्रकल्पाच्या विराेधात चाळीसगाव फाट्यावर सर्वपक्षीय रास्ता राेकाे आंदाेलन झाले हाेते. या आंदाेलनात विविध राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री दादा भुसेंवर सडकून टीका केली हाेती. आता प्रकल्पाच्या समर्थनार्थ साेमवारीच रास्ता राेकाे आंदाेलन हाेत आहे. आंदाेलनात भुसेंशी पाठराखण करत विराेधकांना उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.

समर्थकांमध्येच फूट बंदिस्त कालवा विरोधक व समर्थक हे मुळातच पालकमंत्री भुसे समर्थक शेतकरी कार्यकर्ते असल्याचे सांगितले जाते. बंदिस्त कालवा प्रकरणाने भुसे समर्थकांमध्येच फूट पडली आहे. संघर्षाऐवजी बंदिस्त कालवा प्रकल्प रद्द करून धरणाची जलसाठवण क्षमता वाढवण्याची मागणी कालवा विरोधकांची आहे.

बातम्या आणखी आहेत...