आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराचा अनेक वर्षाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांना यश आले असून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण- मनमाड पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन सोमवारी (दि. १३) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनमाड शहरात दुपारी बारा वाजता होणार आहे. पाणी प्रश्न सुटल्यानंतर आता मनमाड शहराला एमआयडीसी मंजूर होणे प्रस्तावित आहे. तसेच तालुक्यातील जनतेच्या सुविधेसाठी दोन फिरती रुग्णालये आणि दोन फिरती शासकीय कार्यालये या योजनाही लवकरच जनसेवेमध्ये दाखल होत आहेत, अशी माहितीही आमदार सुहास कांदे यांनी येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. महर्षी भगवान वाल्मीकी क्रीडा संकुलात दुपारी १२ वाजता होणाऱ्या कार्यक्रमास उद्योगमंत्री उदय सामंत, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
करंजवण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पाणीपुरवठा योजना ही ३११ कोटी रुपयांची असून या कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली आणि जवळपास ११ टक्के योजनेचे काम झालेले आहे. येत्या १८ महिन्यात ही योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मनमाडकरांच्या घराघरात दररोज पाणी यावे हे मनमाडकर जनतेचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. शहरात औद्योगिक वसाहत व्हावी ही गेल्या अनेक वर्षांपासूनची जुनी मागणी यानिमित्ताने पूर्णत्वास येऊ शकते. औद्योगिक वसाहतीठी मनमाड नजीक अनकवाडे सटाणे परिसरात ६७२ एकर क्षेत्राचा प्रस्तावही शासनाला पाठवला आहे.
या औद्योगिक वसाहतीतून मनमाड व तालुका परिसरातील किमान पंधरा हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचा दावा कांदे यांनी केला. मनमाड येथून रेल्वे तसेच रस्ता वाहतूकही सोयीची असल्याने औद्योगिक वसाहत अत्यंत मध्यवर्ती आणि सोयीचे ठरेल त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिली. मनमाड औद्योगिक वसाहतीचे सर्वेक्षण देखील पूर्ण करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, महिला आघाडीच्या विद्या जगताप, संगीता बागूल आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.