आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादररोज हजारो प्रवाशांचा राबता असलेल्या शहरातील जुन्या सीबीएस बसस्थानकातील सीसीटीव्ही गत दोन वर्षांपासून बंद असल्याची धक्कादायक बाब डी.बी. स्टारच्या पाहणीत समोर आली. बंद असलेल्या सीसीटीव्हीमुळे हजारो प्रवाशांची सुरक्षा धाेक्यात आहे. बसस्थानकावरील कॅमेऱ्यांसंदर्भात तक्रारी करूनही एस.टी.च्या अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. बसस्थानकावरील बंद असलेले सीसीटीव्ही चोरट्यांच्या पथ्यावर पडत असून सततच्या चोऱ्यांनी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावर डी.बी. स्टारने टाकलेला हा प्रकाशझोत...
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेकडेच दुर्लक्ष केले जात असल्याचे समाेर आले आहे. शहरातील मध्यवर्ती सीबीएस बसस्थानकाची काही वर्षांपूर्वी डागडुजी करत नूतनीकरणाचे काम करण्यात आले. या बसस्थानकाच्या व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसस्थानकाच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले होते. मात्र, काही महिन्यांतच हे सीसीटीव्ही बंद पडल्याने बसस्थानकावर चोरीच्या घटना वाढल्या आहेत. सीबीएस स्थानकावरून धुळे, नंदुरबार, साक्री, नवापूर, पेठ, सुरगाणा, सटाणा, देवळा, दिंडाेरी, इगतपुरीकडे जाणाऱ्या बसेस लागतात. त्यामुळे या बसस्थानकात नेहमीच प्रवाशांची माेठी गर्दी असते.
या गर्दीचा फायदा चोरटे घेत आहेत. चोरी झाल्याचे प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर तक्रार केली जाते. पोलिसही घटनास्थळी येतात. परंतु, सीसीटीव्ही बंद असल्याने चोरट्यांचा शोध घेण्यात अडचणी येतात. सीसीटीव्ही सुरू करण्यासंदर्भात बसस्थानकावरील कर्मचाऱ्यांसह पोलिसांकडून वेळोवेळी एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठांना सांगूनही अद्याप कुठलीच कार्यवाही झाली नसल्याचे पोलिसांसह बसस्थानकातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
चोऱ्यांमुळे बसस्थानकावर येणारे प्रवासी हैराण जुन्या सीबीएस बसस्थानकावर नंदुरबार, सटाणा, नवापूर, अक्कलकुवा, साक्री, लासलगाव, पिंपळगाव, कळवण, पेठ या आगारातील बसची ये-जा असते. त्यामुळे दररोज हजारो प्रवाशांची चढ-उतार होते. याच गर्दीचा फायदा घेत चाेरट्यांकडून महिलांच्या गळ्यातील दागिने, पर्समधील पैसे व माैल्यवान वस्तूंबराेबरच पाकीट चाेरीच्या प्रकारात वाढ झाली आहे.
कंट्रोल रूमही झाले भंगार गोदाम सीसीटीव्ही दोन वर्षांपासून बंद असल्याने यासंदर्भात विभागीय नियंत्रकांकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या ठिकाणी कार्यरत असलेल्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे, या सीसीटीव्हीचे कंट्रोल रूमला सध्या भंगार गोदामाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पोलिसांचीही डोकेदुखी वाढली सीबीएस बसस्थानकावर चोरी झाल्यानंतर प्रवाशांकडून पाेलिसांत फिर्याद दाखल झाल्यानंतर पाेलिसांकडून तपास सुरू केला जाताे. मात्र, या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही बंद असल्याने तपासात अडचण येते. याचाच फायदा चाेरट्यांकडून घेतला जात आहे. त्यामुळे या बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा फटका पोलिसांना बसत आहे.
पोलिसांच्या पत्रव्यवहाराकडेही दुर्लक्ष मागील दोन वर्षांपासून जुन्या बसस्थानकातील सीसीटीव्ही सुरू करण्यासंदर्भात एस.टी.च्या अधिकाऱ्यांकडे पोलिसांकडून पत्रव्यवहार केला जात आहे. मात्र, त्याकडे एस.टी.कडून दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याकडून डी.बी. स्टारकडे देण्यात आली. विशेष म्हणजे, याच वर्षी पाचहून अधिकवेळा पत्रव्यवहार झालेला असताना या पत्रांची कुठलीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे चोरीच्या घटनांचा उलगडा होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.