आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदूरशिंगोटेसह परिसरातील गावांंमध्ये वारंवार होणाऱ्या घरफोड्याचे प्रकार थांबवण्यासाठी सीसीटीव्हीची उपाय योजना करण्यात येणार आहे. नांदूरशिंगोटे पोलिस चौकी अंतर्गत येणाऱ्या १८ गावांतील पदाधिकाऱ्यांची वावी पोलिस ठाण्यात बैठक पार पडली. ग्रामीण पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलिस अधीक्षिका माधुरी कांगणे, उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
नांदूरशिंगोटे व परिसरात दोन महिन्यांपासून सातत्याने घरफोडीच्या घटना घडत आहेत. त्यास आळा घालण्यासाठी ग्रामस्थांनी सजग रहावे, संशयित व्यक्ती आढळल्यास कळवावे, असे आवाहन सहायक निरीक्षक कोते यांनी केले. गावातील प्रमुख चौक, मार्ग महत्त्वाच्या ठिकाणांवर सीसीटीव्ही बसविण्यात यावेत अशी सूचना सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, ग्रामरक्षक दलाचे कार्यकर्ते यांना करण्यात आली. या उपाययोजनेमुळे चोरट्यांवर वचक निर्माण होईल, चोरीच्या घटनातील संशयितांचा तपास लागण्यास मदत होईल. त्यामुळे सीसीटीव्ही उपाय महत्त्वपूर्ण असल्याचे मार्गदर्शन सागर कोते यांनी केले.
महामार्गावर उपाय फायदेशीर
नाशिक-पुणे, सिन्नर-शिर्डी या महामार्गांवरील वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणारे हॉटेल, ढाबे यावर सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना व्यावसायिकांना यापूर्वी करण्यात आल्या होत्या. सहायक निरीक्षक सागर होते यांनी त्याची अंमलबजावणी व्यावसायिकांकडून करून घेतली. त्यामुळे काही घटनांत महामार्गावरील सीसीटीव्ही फायदेशीर ठरले आहेत. घटनांची उकल करण्यास मदत झाल्याचे सहायक निरीक्षक कोते यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.