आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वास्थ्य रथ:जिल्ह्यात बालमृत्यू; महिला कुपोषण मुक्तीसाठी स्वास्थ्य रथ

नीलेश अमृतकर | नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील अतिदुर्गम खेड्यापाड्यांवर शासकीय रुग्णालय सेवा पुरेशी उपलब्ध नाही. त्यामुळे नसल्याने महिलांमधील कुपाेषण व बालमृत्यूचे प्रमाण वाढते. ते राेखण्यासाठी श्री गुरूजी रुग्णालय संचालित सेवा संकल्प समितीच्या माध्यमातून हैद्रराबादच्या कंपनीकडून सीएसआर निधीतून सुमारे २.५० काेटी रुपये खर्चून स्वास्थ रथ (फिरते रुग्णालय) पाड्यांवर फिरणार आहे. बुधवारपासून हा रथ रुग्णसेवेत दाखल लाेणार आहे.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानच्या वतीने नाशकातील श्री गुरुजी रूग्णालयाच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर, हरसूल, पेठ, सुरगाणा, करंजाळी या भागातील खेड्यापाड्यांवर व दुर्गम भागात नियमित रुग्णसेवेसाठी उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, आता सेवा संकल्प समितीच्या प्रयत्नातून व केंद्रीय आराेग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांच्या सहकार्याने आदिवासी खेडेपाड्यावर हा स्वास्थ रथ अर्थात फिरते रुग्णालय फिरवला जाणार आहे. या व्हॅनमध्ये अत्याधुनिक पॅथलाॅजी लॅब असून रक्त, लघवी, महिलांच्या आजारासंबंधीच्या विशेष तपासण्यासाठी यंत्रणा असणार आहे. दाेन तज्ज्ञ डाॅक्टर, नर्सेस, पॅथलाॅजी तंत्रज्ञ, एक्सरे मशीन, आैषधाेपचारसाठी स्वतंत्र फार्मासिस्ट व आैषध भांडार असणार आहे.

माता-बालमृत्यू राेखण्यास प्राधान्य
या स्वास्थ रथात पूर्णपणे माेड्युलर आणि अत्याधुनिक यंत्रणा आहे. या रथाद्वारे बालमृत्यू व महिलांमधील कुपोषण राेखण्यासाठी आवश्यक तपासण्या व आैषधाेपचार अत्यल्प दरात करण्यात येणार आहे. त्याचा वाडी, वस्त्यांवरील नागरिकांना चांगला फायदा हाेणार आहे. डाॅ. राजेंद्र खैरे, कार्यवाह, सेवा संकल्प समिती

असे फिरणार रथ
फिरते रुग्णालय आठवड्यातून दाेन दिवस फिरणार आहे. तसेच, ज्या खेड्यानजीक आठ ते दहा पाडे आहेत, अशा ठिकाणी माेबाइल व्हॅन फिरून रुग्णांची नियमीत तपासणी करेल. आठवड्यातून तीन दिवस चार-चार खेड्यांवर मुक्कामी राहून तपासण्या करण्यात येणार आहे. यामध्ये महिला वर्गावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. त्यांच्या तपासण्यांचे जागेवरच निदान हाेणार आहे. सुरूवातीला पहिल्या आणि तिसऱ्या आठवड्यात असे दाेन दिवस करंजाळी येथे अंबाेड (ता. सुरगाणा) गावात बुधवार व गुरूवार आणि उंबरठाण( ता. सुरगाणा) येथे शनिवार व रविवार मुक्काम असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...