आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाेरी अंबेदरी धरण बंदिस्त कालव्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी साेमवारी (दि. १२) सकाळी झाेडगेत रास्ता राेकाे करण्यात आला. गावात सर्वपक्षीय कडकडीत बंद पाळून सुमारे अर्धा तास मुंबई-आग्रा महामार्ग राेखत जाेरदार घाेषणाबाजी झाली. पालकमंत्री दादा भुसे यांनी भ्रमणध्वनीवरून आंदाेलकांशी संवाद साधून बंदिस्त कालव्याचे काम लवकरच सुरू हाेईल, असे ठाेस आश्वासन दिले. त्यांच्या आश्वासनानंतर आंदाेलन तत्काळ मागे घेण्यात आले.
दरम्यान, काही तरुणांनी बंदिस्त कालव्याविराेधात भूमिका घेणारे भाजप नेते अद्वय हिरे, माजी नगरसेवक सुनील गायकवाड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. तुषार शेवाळे व बाराबलुतेदार मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंडूकाका बच्छाव यांचे प्रतीकात्मक पुतळे जाळण्याचा प्रयत्न केला.
बंदिस्त जलवाहिनीस विराेध दर्शवत स्थानिक शेतकऱ्यांचे मागील ३५ दिवसांपासून आंदाेलन सुरू आहे. आता बंदिस्त कालव्याच्या समर्थकांनी एकजूट दाखवत झाेडगे गाव बंद ठेवून रास्ता राेकाेचा इशारा दिला हाेता. त्यानुसार सकाळपासून गावातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद हाेती. गावाच्या मुख्य चाैकात एकत्र जमून बंदिस्त कालव्याची गरज व्यक्त करण्यात आली. खुल्या पाटचारीने झाेडगे गावापर्यंत पाणी कधीच पाेहाेचू शकणार नाही. चार दिवसांत काम सुरू करण्याचे आश्वासन देणारे प्रशासन झाेपेचे साेंग घेत आहे. प्रशासन काम हाती घेणार नसले तर जनता स्वत: पाईप टाकण्याचे काम करेल, असा इशारा देण्यात आला. हा लढा माळमाथ्यासाठी असून पाणी मिळेपर्यंत संघर्ष करण्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
यानंतर आंदाेलकांनी मुंबई-आग्रा महामार्गावर ठाण मांडले. आंदाेलनामुळे दाेन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली हाेती. पाटबंधारे विभागाचे उपअभियंता महेंद्र नेटावदे यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार काम सुरू हाेईल असे आंदाेलकांना सांगितले. मात्र, महसूल, पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आंदाेलनस्थळी येत नाही ताेपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला. अखेर पालकमंत्री भुसे यांनी भ्रमणध्वनीवरून रस्ता अडवू नका, यासंदर्भात बैठकीचे नियाेजन केले आहे. लवकरच कामाला सुरुवात हाेईल, असे आश्वासन दिले. यानंतर तहसीलदार कैलास पवार यांना निवेदन देत आंदाेलन मागे घेण्यात आले. पाेलिसांनी आंदाेलन केल्याप्रकरणी ४१ जणांना ताब्यात घेत नंतर त्यांची सुटका केली.
आंदाेलनात नथू देसले, विजय देसाई, माजी सरपंच दीपक देसले, दीपक पवार, याेगेश देसले, सरचंप चंद्रकाला साेनजे, उपसरपंच बेबीबाई देसले, प्रवीण देसले, नंदू ठाकरे, खलील शेख, आरिफ पठाण, शकील शेख, सुधाकर राजुरे, विजय गुरव, मुकेश गवांदे, विकास खेडकर यांच्यासह अस्ताणे, लखाणे, राजमाने, कंधाणे, पळासदरे, भिलकाेट आदी गावांचे नागरिक व महिला माेठ्या संख्येने सहभागी झाल्या हाेत्या.
बंदिस्त पाइपलाइन प्रकल्प झालाच पाहिजे, अशा पत्रकांचे वाटप
बंदिस्त पाइपलाइन प्रकल्प झालाच पाहिजे, या आशयाची पत्रके वाटण्यात आली. प्रकल्पाचे भविष्यातील फायदे अधाेरेखित करत विराेध करण्याची कारणे नमूद केली आहे. बाेरी अंबेदरी व दहिकुटे प्रकल्प मार्गी लागले तर भुसे विराेधकांचे राजकीय अस्तित्व संपणार आहे. याच भीतीपाेटी विराेधक एकजूट दाखवत शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करत असल्याचा आराेप केला आहे. राजकीय स्वार्थासाठी पाणीप्रश्नाचे राजकारण करणाऱ्यांना साथ द्यायची की, पाण्याचा वनवास संपविण्यासाठी भगीरथ प्रयत्न करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे रहायचे असे आवाहन केले गेले.
तरुणांकडून घाेषणाबाजी
आंदाेलन संपताच काही तरुणांनी अद्वय हिरे, डाॅ. तुषार शेवाळे, सुनील गायकवाड व बंडूकाका बच्छाव यांचे प्रतीकात्मक पुतळ्यांना जाेडे मारत निषेध केला. पुतळे पेटविण्याचा प्रयत्न करत असताना पाेलिसांनी राेखले. यानंतर संताप व्यक्त करून घाेषणाबाजी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.