आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाद एकच, एकच, बैलगाडा शर्यत... गाण्यावर जोरदारपणे रंगलेला नृत्याविष्कार, त्यास प्रेक्षकांचा टाळ्यांचा कडकडाटात जोरदारपणे मिळणारा प्रतिसाद, ग्रामस्थ आणि पालकांकडून विद्यार्थ्यांवर होणारी बक्षिसांची लयलूट, मधूनच दर्दींकडून वन्स मोअरचा आग्रह, असा संगीतमय माहोल घोटेवाडी जिल्हा परिषद शाळेत अनुभवयास मिळाला. निमित्त होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आणि शाळा विकासात योगदान देणाऱ्या देणगीदारांच्या सन्मानाचे.
व्यासपीठावर सातपूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीश घोटेकर, वावीचे सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते, दिव्यांग कर्मचारी आणि अधिकारी संघटनेचे राज्य सचिव ललित सोनवणे, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय भोर, केंद्रप्रमुख संदीप लेंडे, सरपंच मंजुश्री भरत घोटेकर, उपसरपंच रंजना घोटेकर, चंद्रभान घोटेकर, सिन्नर रोडवेजचे दत्ताशेठ ढमाले, बांधकाम व्यावसायिक नारायण सरोदे, रामनाथ ढमाले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत ढमाले, उपाध्यक्ष साईनाथ सरोदे, रघुनाथ घोटेकर, रघुनाथ कांदळकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमापूर्वी शाळा विकासात योगदान देणाऱ्या सर्व देणगीदारांना स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक संतोष झावरे, शिक्षक पोपट नागरगोजे, सुरेश दिघे, सुरेखा शेळके, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व तरुणांनी परिश्रम घेतले. स्वॅग से करेंगे सबका स्वागत, ब्रुम ब्रुम, देशभक्तीपर गीत, धनगर गीत, महाराष्ट्राची लोकधारा, मैय्या यशोदा, भीमगीत, राजं आलं राजं आलं, फनी डान्स, नाद एकच बैलगाडा शर्यत अशा एकाहून एक सरस गीतांनी सांस्कृतिक महोत्सवाची मैफल रंगत गेली. उपस्थित ग्रामस्थांमधून ३० हजारांची रोख बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद देण्यात आली.
दातृत्वाची निकोप स्पर्धा...
गावातील देणगीदारांच्या आणि ग्रामपंचायतीच्या निधीतून शाळेचे रुपडे पालटले आहे. त्यासाठी तब्बल ४ लाख १२ हजारांची रोख स्वरूपात देणगी प्राप्त झाली. व्यासपीठाचे छत आणि प्रवेशद्वार यासाठी १ लाख १० हजारांचा खर्च देणगीदारांनी केला. कार्यक्रमानंतर संपूर्ण ग्रामस्थांना भोजन, कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टिम, फोटो शूटिंग, प्रकाश व्यवस्था, पाण्याचे जार याची संपूर्ण जबाबदारी तरुणांनी उचलली. शाळेचा अमृत महोत्सव लोक सहभागातून यशस्वी करण्यासाठी देणगीदारांमध्ये अक्षरशः स्पर्धा बघायला मिळाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.