आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या दीड ते दोन वर्षांपासून मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी-सिन्नर चौफुलीवर घोटी ते खंबाळेदरम्यान उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यातच पावसामुळे या महामार्गावर असंख्य खड्डे पडले आहेत. परिणामी खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहनचालक व प्रवाशांच्या नाकीनऊ येत आहे. याबाबत तीन महिन्यांपासून महामार्ग प्राधिकरण व टाेल प्रशासनाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात हाेते. सामान्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या महामार्ग प्राधिकरण व टाेल प्रशासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवार व शनिवारी दाेन दिवसांच्या नाशिक दाैऱ्यावर येत असल्याने एका दिवसात महामार्गावरील खड्डे दुरुस्तीसाठी मात्र तत्परता दाखवली आहे.
पावसामुळे महामार्गावर खड्डे पडली आहेत. ही खड्डे माेठी व खाेल असल्याने वाहने त्यात अडकून बंद पडत असल्याने वाहतूक काेंडी निर्माण हाेत आहे. तसेच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. याबाबत टाेल प्रशासन व महामार्ग प्राधिकरणाकडे महामार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालक व प्रवाशांनी केली हाेती. मात्र, त्याकडे अधिकाऱ्यांनी सर्रास दुर्लक्ष केले. त्यामुळे महामार्गावरून खड्ड्यांतूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. मात्र, आता मुख्यमंत्री येणार असल्याने अधिकाऱ्यांनी महामार्गाच्या दुरुस्तीसाठी दाखविलेल्या तत्परतेमुळे सामान्य नागरिकांनी संताप व्यक्त करत फक्त मंत्र्यांच्या दाैऱ्यांसाठी महामार्ग दुरुस्त करणार का? सामान्यांच्या गैरसाेयींचे काय? असा सवाल उपस्थित केला आहे.
महामार्गावरील खड्ड्यांत मुरुमाची मलमपट्टी
केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या महामार्गावरून जाणार असल्याने महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावरील खड्ड्यांमध्ये मुरुम टाकून बुजविण्याचे सौजन्य राष्ट्रीय अधिकाऱ्यांनी दाखवले आहे. पावसाचे माहेरघर असलेल्या या तालुक्यात पहिल्याच पावसात रस्त्यावरील डांबरीकरण टिकत नसल्याने केवळ मुरुमाची मलमपट्टी किती वेळ तग धरणार असा सवाल उपस्थित हाेत आहे. विषेश म्हणजे, केवळ मुंबईकडून नाशिककडे येणाऱ्या बाजूलाच खड्डे बुजविले जात असले तरी नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या बाजूवरील खड्डे अद्यापही ‘जैसे थे’ आहेत.
टोलनाक्याची सजावट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याने घोटी टोलनाक्यानेही सजावट केली आहे. मात्र, इतर दिवशी येणाऱ्या प्रवाशाना साधे स्वच्छ शौचालयदेखील उपलब्ध करून दिले जात नाही. त्यामुळे केवळ मुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्यापुरतीच सजावट व स्वच्छता राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.