आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगरपालिकेने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी २१ जून रोजी प्रसिद्ध केली. या यादीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळल्याने नावे शोधताना सत्ताधारी, विरोधक यांच्यासोबतच इच्छुकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मतदार राहतात एका प्रभागात आणि नावे मात्र त्यांची भलत्याच प्रभागात असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात अल्प कालावधीत हरकती कशा घ्यायच्या, असा प्रश्न राजकीय पक्षाच्या इच्छुकांसमोर उभा राहिला आहे.
२१ जून रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार यादीवर हरकत घेण्यासाठी २७ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रभागांची रचना ज्याप्रमाणे झाली, त्याचप्रमाणे म्हणजे परिशिष्ट २ नुसार मतदारांची नावे आपापल्या प्रभागात येणे अपेक्षित आहे. मात्र नगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत परिशिष्ट २ चा भंग करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसत आहे. यासंदर्भात सत्ताधारी आणि राजकीय अशा दोन्हीकडील आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे ही संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की, त्यावर हरकती घेताना मतदारांची अडचण झाली आहे. या याद्या बनवताना नगरपालिका प्रशासनाने घरपट्टी, पाणीपट्टी वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन काम करणे अपेक्षित होते. मात्र यासाठी कंत्राटी कर्मचारी आणि इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांना कामाला लावल्याने हा घोळ झाल्याचे आरोप राजकीय मंडळींकडून केला जात आहे.
विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर दुबार नावे असल्याने राजकारण्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत प्रशासनालाही धारेवर धरले होते. त्यातून धडा घेत प्रशासन ही नावे कमी करेल, अशी अपेक्षा असताना शहरात मात्र तब्बल अडीच हजाराहून अधिक नावे दुबार असल्याचे राजकीय पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकाच प्रभागातील शेकड्यावर नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याने इच्छुकांची गोची झाली आहे. मतदार याद्या निर्दोष असणे आवश्यक असताना नगरपालिकेच्या घोळामुळे त्यात असंख्य त्रुटी असल्याचे समोर आले आहे. मतदारांचीही आपली नावे प्रभागातील मतदान यादीत शोधताना धावपळ होणार असून त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. हरकतींसाठी वेळ कमी असला तरी निवडणूक प्रक्रिया तातडीने लागलेली नसल्याने यासाठी नगरपालिकेने निवडणूक आयोगाकडून वेळ मागून घेऊन या मतदार याद्या प्रभागनिहाय दोषरहित बनवाव्यात, अशी मागणी राजकीय पक्षांकडून होऊ लागली आहे.
मतदारांनी हरकत घ्यावी
२७ जूनपर्यंत मतदारांनी हरकत घेतल्यास त्यांची नावे कुठल्या प्रभागात आहे याची खात्री करून वास्तव्यास असलेल्या प्रभागातील मतदार यादीत समाविष्ट केली जातील. दुबार नावे असल्यास मतदारांच्या संमतीने एकाच ठिकाणचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाईल. - संजय केदार, मुख्याधिकारी
निवडणूक आयोगाकडे तक्रार
मतदार यादी बनवताना नगरपालिका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात चुका झाल्या आहेत. २८५३ नावे दुबार आहेत. याशिवाय वास्तव्य एका प्रभागात आणि मतदार यादीत नाव भलत्याच प्रभागात असे प्रकार झाले आहेत. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. - मेहमूद दारूवाला, माजी नगराध्यक्ष
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.