आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:ग्राहकांना वाढीव वीजबिलांचा शाॅक, मालेगावी महावितरणविराेधात माेर्चा

मालेगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व तालुक्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीजबिलांचा शाॅक देणाऱ्या महावितरण कंपनीविराेधात बाराबलुतेदार मित्रमंडळाने साेमवारी दुपारी माेर्चा काढला. अवास्तव बिलांची आकारणी थांबवा, ग्राहकांना याेग्य बिले द्यावीत, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदाेलन छेडण्याचा इशारा देत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंडूकाका बच्छाव यांनी कार्यकारी अभियंता जी. के. भामरे यांना निवेदन दिले.

एकात्मता चाैकातून बाराबलुतेदार मंडळ, रिपाइं व वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत महावितरणच्या माेती भवन कार्यालयावर माेर्चा काढला. निषेधाचे फलक हाती घेत माेर्चा बारा बंगला भागातील माेती भवनवर धडकला. येथे कार्यालयासमाेर ठिय्या देत जाेरदार घाेषणाबाजी करण्यात आली. यावेळी बंडूकाका बच्छाव यांनी महावितरण कंपनी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविषयी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. वीज मीटरच्या रीडिंगमध्ये दाेष नाही, मीटरही सदाेष आहेत, रीडिंग घेणारी एजन्सीही तुमची आहे मग वाढीव बिलांची आकारणी हाेतेच कशी? चुकीची बिले देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काय कारवाई केली असा प्रश्न बच्छाव यांनी उपस्थित केला. सरासरी वीजबिले पाठविताना कुठले निकष लावले अशी विचारण करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

कार्यकारी अभियंता भामरे यांनी निवेदन स्वीकारून काही ग्राहकांना चुकीने अवास्तव बिले दिल्याची कबुली देत बिलांमध्ये दुरुस्तीचे आश्वासन दिले. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भरत जगताप, भारत म्हसदे, जितू देसले यांनीही वीज कंपनीच्या मनमानी कारभाराचा निषेध केला. आंदाेलनात बाराबलुतेदार मित्रमंडळाचे अध्यक्ष कमलाकर पवार, रिपाइंचे तालुकाध्यक्ष दिलीप आहिरे, येसगावचे सरपंच सुरेश शेलार, स्वप्नील देवरे, भरत पाटील, जितेंद्र देसले, क्रांती पाटील यांच्यासह तालुक्यातील शेतकरी व नागरिक सहभागी झाले हाेते.

शेतकऱ्याला ४१ हजारांचे बिल
समाधान हरपळे या शेतकऱ्यास घरगुती वापराचे जुलै महिन्याचे वीजबिल ४१ हजार १९३ रुपये दिले गेले. त्यांना दरमहा ४१ ते ५० युनिटचे बिल येत हाेते. त्यांच्या घरात एसी, टीव्ही, कूलर नाही तरीही २७०० युनिटचे बिल कसे देण्यात याचे उत्तर द्या, अशी विचारणा बच्छाव यांनी केली. ग्रामीण भागात दरराेज ८ ते १० तासांचे भारनियमन हाेत असते. तरीही वाढीव बिले देऊन ग्रामीण जनतेचा छळ केला जात असल्याचा आराेप करत बच्छाव यांनी अनेक नागरिकांना प्राप्त झालेल्या वाढीव वीजबिलांच्या प्रती अधिकाऱ्यांना सादर केल्या.

बातम्या आणखी आहेत...