आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखो रुपयांचा गैरव्यवहार:भाक्षी ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या चाैकशीचे आश्वासन; उपोषण स्थगित

सटाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाक्षी (ता.बागलाण) ग्रामपंचायतीत विविध विकासकामांच्या निधीत झालेल्या लाखो रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी १५ नोव्हेंबर पर्यंत करण्याचे लेखी आश्वासन प्रभारी गटविकास अधिकारी हिरे यांनी दिले. त्यामुळे मंगळवारी (दि.१) सुरू करण्यात आलेले उपोषण सायंकाळी सात वाजता मागे घेण्यात आले.

दरम्यान, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार भाक्षी ग्रामपंचायतीतील लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी न झाल्यास पुन्हा उपोषण केले जाईल, असा इशारा प्रगतिशील शेतकरी व उपोषणकर्ते प्रकाश देवरे यांनी दिला आहे.

सरपंच पूनम सूर्यवंशी व ग्रामसेवक निसार शेख यांनी ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांच्या निधीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार प्रकाश देवरे, पंकज कापडणीस व गोरख देवरे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करावी, असे आदेश जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते.

मात्र दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीसाठी स्थानिक गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांचे संयुक्त खाते असल्याने या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी केली जाणार नाही, असा आक्षेप तक्रारकर्त्यांनी घेऊन तालुक्याच्या बाहेरील अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली होती. याबाबत तत्काळ कारवाई न झाल्यास, १७ ऑक्टोबर रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही दिलेला होता.

२०१५-१६ ते २०-२१ पर्यंत कामांत भ्रष्टाचार
ग्रामपंचायतीमध्ये २०१५-१६ ते २०-२१ पर्यंत सरपंच व ग्रामसेवकाच्या संगनमताने विकासकामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आराेप करत चौकशीच्या मागणीचे निवेदन प्रकाश जिभाऊ देवरे, गोरख नागू देवरे व पंकज यशवंत कापडणीस यांनी जिल्हा परिषदेच्या उप मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना ऑगस्ट महिन्यात दिले होते. ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले लोकप्रतिनिधी, ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने १४ वा वित्त आयोग, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे योजना, ग्रामनिधी, आदींमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...