आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून सर्वप्रकारच्या ठेवी परत मिळाव्यात, या मागणीसाठी नांदगाव तालुका शाखेतर्फे नाशिक येथे गेल्या तीन दिवसांपासून वस्त्रत्याग धरणे आंदोलन सुरू होते. प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शनिवारी स्थगित करण्यात आले. विभागीय सहनिबंधक कार्यालय, गडकरी चौक,नाशिक येथे वस्त्रत्याग धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. सदर आंदोलनाच्या मागण्यांची पूर्तता शनिवारी लेखी आश्वासन देऊन करण्यात आली. जिल्हा सहकारी बँकेच्या ठेवीदारांना येत असलेल्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी बँकेने प्रभावशाली व मोठ्या थकबाकीदारांकडून वसुली मोहीम सुरू केली आहे.
३१ मार्चपर्यंत प्राप्त होणाऱ्या थकबाकी वसुलीतून सर्व ठेवीदार व पतसंस्थांना ठेवीची रक्कम परत करण्यासाठी सम न्यायिक पध्दतीने धोरण ठरवून त्याची अंमलबजावणी करून ३१ मार्चनंतर वितरण करण्यात येईल, असे लेखी पत्र जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना दिले आहे. सहकार आयुक्त पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलनाचे राज्य उपाध्यक्ष अशोक सब्बन यांच्याशी चर्चा केल्यानंतर १५ एप्रिलपर्यंत सदर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. नाशिक येथे करण्यात आलेल्या या वस्त्रत्याग धरणे आंदोलनात मनमाड येथील पदाधिकारी तीन दिवसांपासून सहभागी झाले होते.त्यांना पतसंस्था फेडरेशनने पाठिंबा दिला होता. तालुकाप्रमुख भिमराज लोखंडे, सचिव भास्कर झाल्टे, विष्णू चव्हाण, रामदास दुभासे, सुनील म्हस्के, कादीर शेख यांनी त्यात सहभाग घेतला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.