आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी व पशुपालक धास्तावले:आखतवाडे परिसरात दाेन बिबट्यांचा शेळ्यांच्या कळपावर हल्ला; चार ठार

जायखेडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आखतवाडे (ता. बागलाण) येथील आनंदपूर शिवारात सोमवारी पहाटे दोन बिबट्यांनी शेळ्यांच्या कळपावर हल्ला करून चार शेळ्या ठार केल्या. तर एक शेळी गंभीर जखमी आहे.तांदुळवाडी येथे दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात दहा शेळ्या ठार झाल्याची घटना ताजी असतांनाच आखतवाडे येथील शेतकरी गंगाधर दौलत खैरनार यांच्या आनंदपूर शिवारातील शेतात बांधलेल्या शेळ्यांवर सोमवारी पहाटेच्या सुमारास दोन बिबट्यांनी हल्ला करून चार शेळ्यांना ठार तर एका शेळीस गंभीर जखमी केले.

या घटनेमुळे शिवारातील शेतकरी व पशुपालक धास्तावले असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी गंगाधर खैरनार पहाटे पाळीव जनावरांकडे फेरफटका मारण्यास गेले असता त्यांनी दोन बिबटे बकऱ्यांवर हल्ला करताना दिसल्याचे सांगितले. घाबरल्याने त्यांनी सुरक्षित जागी जाऊन बिबट्यांवर विजेरी चमकवून आरडाओरडा केला.

त्यांनतर बिबटे मक्याच्या शेतात निघून गेले. या घटनेबद्दल सकाळी वन विभागास कळविले वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. या भागात मका व बाजरी मोठया प्रमाणात असल्याने बिबट्याला येथे निवारा मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वन विभागाने लवकरात लवकर शासनाकडून शेतकऱ्याला भरपाई मिळवून द्यावी व बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...