आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक काढत आभार व्यक्त केले:पूर पाण्याने दातलीचा पाझरतलाव ओव्हरफ्लो;  २५० हेक्टरला लाभ

भरत घोटेकर | सिन्नर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पशा पर्जन्यमानामुळे गंभीर परिस्थिती असतानाही देवनदीतील पाण्याने कुंदेवाडी- सायाळे या बंदिस्त पूर कालव्याद्वारे अवघ्या ७ दिवसांत दातलीचा पाझर तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. ७० दलघफू क्षमतेचा पाझर तलाव ओव्हरफ्लो झाल्याने दातली परिसरातील २५० हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे.‌दातलीसह मुसळगाव आणि गोंदे या तीन गावच्या शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ होणार असून त्यांना बारमाही पिके घेता येणार आहे. पूर पाणी दुष्काळी भागात पोहोचवत टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आमदार माणिकराव कोकाटे यांची येथील शेतकऱ्यांनी खांद्यावर बसवून मिरवणूक काढत आभार व्यक्त केले.

केपाझर तलाव गेल्या साठ वर्षात केवळ पाच ते सहा वेळा पूर्ण क्षमतेने भरला आहे. कुंदेवाडी - सायाळे या बंदिस्त पूर कालव्याच्या माध्यमातून गोंदे नाल्यातून गेल्या आठवड्यात देव नदीचे पूरपाणी या पाझर तलावात सोडण्यात आले होते. १५ ऑगस्टला हा पाझर तलाव ओव्हरफ्लो झाला. टंचाईग्रस्त भागात बंदिस्त पूरकालव्याच्या माध्यमातून पाणी पोहोचून दातली पाझर तलाव ओव्हरफ्लो झाल्याने दातली परिसरातील शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर आमदार कोकाटे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, सरपंच हेमंत भाबड, उपसरपंच सुवर्णा शेळके, पंढरीनाथ आव्हाड, हेमंत आव्हाड, अनिता भाबड, सुनील चांदोरे, ग्रामविकास अधिकारी परेश जाधव, विजय काटे यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात आले. पूर पाणी मिळवून देत ग्रामस्थांची टंचाई कायमस्वरूपी दूर केल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आपल्यासाठी अत्यंत समाधानाची बाब असल्याचे आमदार कोकाटे यांनी सांगितले.

पाणी किमान दोन वर्षे टिकण्याची अपेक्षा
दातली पाझर तलावाच्या पश्चिमेला मुसळगाव, उत्तरेला दातली तर दक्षिणेला गोंदेचे क्षेत्र आहे. या भागातील शेती तलाव भरल्यामुळे बारमाही पिकणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बंधाऱ्याचे पाणी किमान दोन वर्षे टिकण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...